महापौर, आयुक्त, स्थायी समिती सभापतींनी केला सत्कार
चंद्रपूर, ता. २ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ हे अभियान राबविण्यात येत आहे. मनपाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात सफाईमित्रांना युनिफॉर्म, सुरक्षा किट भेट देऊन त्याचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
शनिवारी (ता. २) राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या हस्ते सफाईमित्रांना हेल्मेट, हॅण्ड ग्लोव्हज, गमबूट, मास्क, युनिफॉर्म, फस्ट एड बॉक्स, रिफेलेवटींग जॅकेट, टॉर्च आदि साहित्य भेट देण्यात आले.
केंद्र सरकारच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत चंद्रपूर मनपाकडून सफाई मित्र व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. मलनि:सारण वाहीनी, सेप्टीक टैंक व मॅनहोलमध्ये कार्यरत कामगारांना सफाईसाठी अधिकृत आणि शाश्वत यंत्रणेमध्ये समावेश करुन घेणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा आहे. जीवित हानी टाळण्यासाठी मलनि:सारण वाहीनी, सेप्टीक टँक व मॅनहोल मध्ये मानवी वापर कमी करून यांत्रिकीकरणाच्या साफसफाईला प्रोत्साहन देण्यावर भर आहे. काही अत्यावश्यक ठिकाणी धोकादायक पध्दतीने सफाई करण्याची गरज भासल्यास सुरक्षेची साधने आवश्यक असतात. या अभियानाच्या माध्यमातून सफाईमित्रांना सुरक्षा कवच म्हणून युनिफॉर्म, सुरक्षा किट भेट देण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते सफाई मित्र अरविंद खोडे, संदीप महातव, सुनील भांदकेकर, बहादूर हजारे, आनंद कालेस्कोर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार आदींची उपस्थिती होती.