ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. पिंपळे या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असताना त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. पिंपळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांच्या धाडसाचं कौतुक करतानाच त्यांना एक आश्वासन दिलं.
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कल्पिता पिंगळे यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून दिला. कल्पिता यांनी फोन घेताच मुख्यमंत्र्यांनी, “तुमचं कोणत्या शब्दांत कौतुक करावं. मी तुम्हाला शब्द देतो की…तुम्ही बरे झाल्यानंतर कारवाई करणार म्हणत आहात, पण आता ती जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. तुम्ही चिंता करु नका. लवकर बरे व्हा,” असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपण या हल्ल्यानंतर भेट घेण्यासाठी का आलो नाही यासंदर्भातही कल्पिता यांना माहिती दिली. “मला रोज रिपोर्ट येत असतो. उगाच त्यात राजकारण नको म्हणून फोन करणं, भेटणं टाळलं. आरोपींना कडक शिक्षा होणार. त्याची काळजी तुम्ही करु नका,” असं मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांना सांगितलं.