अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर त्यांच्या भूमिकांकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. खासकरून शेजारील राष्ट्र असल्याने भारताची प्रत्येक घडामोडींवर नजर आहे. आता तालिबानी नेत्याने भारताला इशारा दिला आहे. “तालिबान विरोधकांना भारतात आश्रय दिला तर महागात पडेल”, असा इशारा अफगाणी नेते गुलबुद्दीन हेकमत्यार यांनी दिला आहे.
“तालिबान विरोधकांना भारताने आश्रय देऊ नये. यापासून त्यांनी लांब राहीलं पाहीजे. तालिबान विरोधात आश्रय देऊन सरकारविरोधात व्यासपीठ देण्यासारखं आहे. त्यामुळे तालिबानला कृती करणं भाग पडेल.”, असं गुलबुद्दीन हेकमत्यार यांनी सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “अफगाणिस्तान आणि त्यांच्या नविन राजकर्त्यांना काश्मीर प्रश्नामध्ये रस नाही. अफगाणिस्तान भूमीचा वापर इतर देशांना करू देणार नाही. भारताने याबाबत भीती बाळगू नये.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. “अफगाणिस्तानवर दोन देश सत्ता मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. या अपयशाचा भारताने पुनर्विचार करावा आणि ऐतिहासिक चुका भरून काढाव्या”, असं देखील त्यांनी पुढे सांगितलं. “भारताने आता अफगाणिस्तानबद्दल सकारात्मक भूमिका घ्यावी. यापूर्वी त्यांनी सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेला देशांनी केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. गेल्या चार दशकातील चुका भारताने दुरुस्त केल्या पाहीजेत. विदेशी राजवटींचं समर्थन करू नये”, असं देखील सांगितलं.