By : Rajendra Mardane
वरोरा : आपले प्रशासकीय कौशल्य पणाला लावत विविध समाजोपयोगी नावीन्यपूर्ण योजना यशस्वीरीत्या अमलात आणून पाच महिन्याच्या अल्पावधीत शासनाला जवळपास ३.५ कोटी रुपयाचे रेकॉर्डब्रेक उत्पन्न मिळवून देणारे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील महसूल विभागाचे आयकॉन ठरले आहेत.
फेब्रुवारी २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात प्रशांत बेडसे यांनी वरोरा येथे तहसीलदार पदावर रुजू झाल्यावर ‘ मिशन बेडसे ‘ साकारण्यासाठी एकानंतर एक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यात त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांपैकी प्रामुख्याने ‘ शेत रस्ता पंधरवडा ‘ , ‘ सामाजिक साहाय्य योजना ‘ , ‘ अर्ध न्यायिक प्रकरणे निपटारा ‘ , ‘ कोव्हीड – १९ मधून नागरिकांना दिलासा ‘ या बाबी निश्चितच उल्लेखनीय ठरल्या.
मार्च २१ पर्यंत वरोरा तालुक्याची जमीन महसुल वसुली ४० लक्ष रूपये होती. ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या एक महिन्यातच मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या मदतीने ७० लक्ष रुपये केली. कोव्हीड – १९ अंतर्गत नियमावलीचे पालन न करणाऱ्या आस्थापनांकडून तथा विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून ५ लक्ष रुपये वसूल केले. त्यांनी सचोटीने आपले कर्तव्य पार पाडत नवीन आर्थिक वर्षात ५ महिन्यांत सुमारे १.२५ कोटी रुपये व गौण खनिजमधून १.५० कोटी रुपये असे एकूण ३.५० तीन कोटी रुपये शासकीय तिजोरीत जमा केले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मोलाचे योगदान
वरोरा येथे तहसीलदार म्हणून पदभार सांभाळताच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. आनंदवनमध्ये रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. वरोरा कोव्हीडचे ‘ हॉटस्पॉट ‘ बनत असल्याचे निदर्शनास येताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी आनंदवनमध्ये ‘ कोव्हीड तपासणी केंद्र ‘ स्थापन करून तेथील शतप्रतिशत नागरिकांची तपासणी करून घेतली आणि त्यात आढळून आलेल्या रुग्णांना तेथेच ‘ कोव्हीड केअर सेंटर ‘ स्थापन करून उपचार सुरू केला. त्यामुळे आनंदवनचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे ऑक्सीजनचा तुटवडा लक्षात घेत जनतेला आवाहन करून आणि वैयक्तिकरित्या संवाद साधून एकूण ४९ ‘ ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन ‘ वरोरा उपजिल्हा रुग्णालयाला मिळवून दिल्या. परिणामतः रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड सुरू होऊ शकला. नागरिकांमध्ये नियम पालनाबाबत गांभीर्य निर्माण केले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनेक दुकानांना सील ठोकले. प्रशासनातर्फे चाचण्या वाढवून रुग्ण शोधण्यावर भर दिला. शहरातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, जनप्रतिनिधी, सामान्य नागरिक यांचा विश्वास संपादन करून जनता कर्फ्युच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळविले.
अर्धन्यायिक प्रकरणाचा निपटारा
तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बेडसे यांनी कार्यालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व जुन्या व प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेतला. २५ – ३० वर्ष जुन्या व रेंगाळत असलेल्या प्रकरणाचा जलद निपटारा करण्यासाठी वेगवान सुनावण्या घेतल्या. कोर्ट म्हणजे ‘ तारीख पे तारीख ‘ असा समज असणाऱ्या लोकांना अर्जदार, गैरअर्जदारांच्या वकिलांनी कितीही प्रयत्न केले तरीही अपवाद वगळता ३ दिवसापुढील तारीख न देता पुढील ३ तारखांत प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावला. अशी ५२ प्रकरणे त्यांनी तात्काळ निकाली काढली.
नागरिकांच्या सोयीसाठी तहसीलदारांकडून तलाठ्याच्या उपस्थितीचे दिवस जाहीर केले. विविध समस्यांच्या निराकरणासाठी ‘ तालुका नियंत्रण कक्ष ‘ स्थापन केल्याने जनमानसात महसूल विभागावरील विश्वास दृढ होण्यास मदत झाली.
शेतरस्ता पंधरवाडा कार्यक्रमातून केले ८२ रस्ते मोकळे
वरोरा तहसील कार्यालयाचा ‘ शेतरस्ता पंधरवाडा ‘ हा नावीण्यपूर्ण उपक्रम राज्यासाठी प्रेरणादायी ठरला. या उपक्रमाद्वारे तहसीलदार बेडसे यांनी महसूल पदाधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून तब्बल ८२ विवादित प्रकरणे निकालात काढित २४ ठिकाणचे रस्ते मंजूर केले. रस्ते मंजूर केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
सामाजिक साहाय्य योजना
कोरोनामुळे कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांतील सदस्यांना साहाय्य करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनासारख्या सामाजिक साहाय्य योजनांचा लाभ मिळावा यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायती मध्ये एक दिवसीय शिबीर घेतले. त्यात एकाच वेळी ऑफलाइन पद्धतीने २००० अर्ज स्वीकारण्यात आले. छाणनीनंतर खासदार, आमदार व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात ३०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या निडरपणे काम करण्याच्या शैलीचा अनेकांनी धसका घेतला आहे. मात्र वर्षानुवर्षे रखडलेल्या कामाला गती देऊन प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने जनमानसात आदरयुक्त दरारा निर्माण होऊन त्यांची प्रतिमा उंचावली आहे. त्यांच्या या चमकदार कामगिरीमुळे ते महसूल विभागाचे आयकॉन ठरले आहेत.