लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*येत्या 15 दिवसात उर्वरित रक्कम देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करणार*
*अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांचे आश्वासन*
खरीप पणन हंगाम 2020- 21 मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी अर्थात बोनसपोटी द्यावयाची उर्वरीत रक्कम त्वरित प्रदान करण्यात यावी या मागणी संदर्भात विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ . सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव श्री विजय वाघमारे यांच्याशी चर्चा केली. येत्या 15 दिवसात उर्वरित रक्कम देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.
खरीप पणन हंगाम 2020- 21 मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी अर्थात बोनस साठी तीनशे अडतीस कोटी रू रकमेला मंजुरी देण्यात आली असून दि. 1 जुलै रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वित्तीय सल्लागारांतर्फे याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या बोनसपोटी सुमारे 800 कोटी रू रक्कम थकीत असताना केवळ 338 कोटी रू रक्कम प्रदान करून शासनाने शेतकऱ्यांची बोळवण केली असून उर्वरित रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
राज्य सरकारने धान उत्पादक शेतक-यांना देण्यात येणाच्या बोनसची रक्कम पूर्णपणे प्रदान न केल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्हयातील धान उत्पादक शेतक-यांवर अन्याय होत आहे. सध्या शेतीची कामे सुरु झाली असुन रोवणे व सम्बंधित शेतीकामास शेतक-यांना पैश्यांची गरज असताना त्यांच्या हक्काचा बोनस थकीत असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे धान उत्पादक शेतक-यांना एप्रिल महिन्यामध्येच त्यांच्या हक्काचे बोनस मिळणे अपेक्षित होते. पण जुलै महीना उलटून गेला असताना अद्याप बोनस मिळालेला नाही. त्याच प्रमाणे शासनाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या धानाचे पैसे सुद्धा ब-याच शेतक-यांना मिळालेले नाही. या बोनसपोटी शेतकऱ्यांचे 800 कोटी रू शासनाकडे थकीत आहे . मात्र केवळ 338 कोटी रू प्रदान करून उर्वरित रकमेसाठी शेतकऱ्यांना पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसत आहे. अशातच पुन्हा मुसळधार पावसाने शेतीला बसलेला फटका लक्षात घेता धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली गेली आहे . शासनाने खरीप पणन हंगाम 2020- 21 मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी अर्थात बोनसपोटी द्यावयाची उर्वरीत रक्कम त्वरित प्रदान करण्याची आवश्यकता असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सचीवांशी झालेल्या चर्चे दरम्यानम्हटले आहे. येत्या 15 दिवसात उर्वरित रक्कम देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.