जागतिक पातळीवर होणाऱ्या आॅलंपिक स्पर्धेमध्ये देशासाठी पदक मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्याकरीता या खेळाडूंनी घेतलेले परिश्रम, केलेला सराव, त्यांच्यातील प्रतिभा हे देशाचे नावलौकीक करणारी असतात. काही दिवसांतच म्हणजे याच महिन्याच्या जुलै, २३ पासून जपान, टोकियो येथे आॅलंपिक स्पर्धांचे जागतिक पातळीवर आयोजन होणार आहे. या स्पर्धेत भारताने विविध कसोट्यांवर स्पर्धकांची निवड केलेली असून या स्पर्धकांनी आपल्या देशाचे नाव उंचावण्याची जबाबदारी घेतली आहे. यातील स्पर्धेत सामील होणा-यांपैकी काही स्पर्धकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत स्व प्रतिभेच्या बळावर स्वतःला सिद्ध केले आहे. पैकीच रेवती वीरमणि, सक्कीमंगलम् , मदुरै व प्रवीण जाधव, फलटण, सातारा हे आहेत.
२२ वर्षीय रेवती वीरमणि हीच्या वयाच्या ५ व्या वर्षीच पोटाच्या आजाराने वडील सोडून गेले तर त्यांच्या सहा महिन्यानंतर मतिष्क ज्वरामुळे आईचे निधन झाले. त्यानंतर तिची व तिच्या लहान बहिणीच्या पालन-पोषणाची जबाबदारी उचलली तिच्या मोलमजुरी करणा-या ७६ वर्षीय के.अरमाली या आजीने. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतमजुरी व वीटभट्टीवर कमी पैशात कामे करुन मुलीच्या शिक्षणावर भर देणा-या आजीला नातेवाईकांनी मुलींना पण कामावर लावण्याचे सांगितले. तरीपण आजीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मुलीच्या पालन-पोषणात तिच्या परीने कमीपणा येऊ न देण्याचा प्रयत्न करीतच राहिली.
शालेय जीवनात धावक स्पर्धकांची प्रतिभा रेवतीत होती व ते ओळखले तिच्या शाळेतील धीरज सर आणि तामिळनाडू क्रीडा विकास प्राधिकरण येथे कार्यरत असलेल्या कोच कन्नम सर यांनी. त्यांनीच रेवतीतील क्षमता व प्रतिभा लक्षात घेऊन परिश्रम पूर्वक क्रीडा क्षेत्रात करिअर बनविण्यासाठी आग्रह केला. सुरुवातीला आजीने तिच्यातील या प्रतिभेला निखारण्यास परवानगी देण्यास नकार दिला पण लवकरच त्यांची समजूत काढली गेली. पुढे रेवतीला मदुरै येथील लेडी लोक काॅलेजमध्ये प्रवेश व छात्रावासमध्ये राहण्याची सोय करण्यात आली. परवडत नाही व चैनीची वस्तू म्हणून पायात बुट न घालताच रेवती काॅलेज मीट ते कोयंबतूर नॅशनल ज्युनिअर चैंपियनशिप, २०१६ मध्ये अनवानी पावलांनीच धावली. रेवतीने २०१६ मध्ये ज्युनिअर नॅशनल प्रतियोगितेत दोन सुवर्णपदके, सिनिअर नॅशनल प्रतियोगितेत रजत पदक मिळविले. तिचे हे प्रदर्शन लक्षात घेता तिची निवड पुढे नॅशनल कॅम्प पटियाला करीता करण्यात आली. तिच्यातील या प्रतिभेमुळेच २०१९ मध्ये रेल्वे मदुरै डिवीजनमध्ये टीटीई म्हणून निवड होऊन तिचा खडतर जीवन प्रवास मार्गी लागला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रेवती वीरमणि आज (4×400 मीटर मिश्रीत रिले) टोकीयो आॅलंपिकसाठी पात्रता सिद्ध करत तिच्या अपेक्षेपेक्षा खूप आधी ती हे आॅलंपिक स्वप्न जगण्यास तयार आहे.
रेवती वीरमणी प्रमाणेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अवघ्या महाराष्ट्राची मान उंचावेल व शिरपेचात अभिमानाचा तुरा लावणा-या फलटण, सातारा येथील प्रवीण जाधव याची आर्चरी (धर्नुविद्या) विभागात आॅलंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जे एका सामान्य कुटुंबाला प्रवीणच्या या यशाबरोबरच संपूर्ण फलटणात आनंदाचे वातावरण निर्माण करणारे ठरले आहे. इयत्ता ४ थी मध्ये असल्यापासून तो धर्नुविद्या शिकत होता. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षांपासून त्याच्यातील ही आवड, त्यातील त्याची चमक पहिल्यांदा समोर आली. ती चमक हेरणारे त्याचे प्राथमिक शिक्षक विकास भुजबळ व शुभांगी भुजबळ यांच्या प्रयत्नातून क्रीडा प्रबोधिनी, अमरावती येथे त्याची निवड झाली. पुढे क्रीडा प्रबोधिनी, औरंगाबाद नंतर पुणे, दिल्ली या ठिकाणी त्याने धर्नुविद्येचे प्रशिक्षण घेतले.
प्रवीण जाधवच्या घरची परिस्थिती खूपच बेताची असून आई संगीता शेतमजूर आणि वडील रमेश सेंटरिंगच्या कामावर रोज जाणारे आहेत. रोज काम केल्या शिवाय त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही अशी बिकट परिस्थिती असतांना देखील प्रवीणने कष्ट आणि जिद्द उराशी बाळगत देशासाठी खेळण्याचं स्वप्न आणि एकच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल केली आहे. त्याने आतापर्यंत १० वेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून ब-याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळविली असून नेमबाजीच्या कौशल्यावर त्याची २०१५ साली आंतरराष्ट्रीय ज्युनिअर कॅंपसाठी निवड झाली. यातूनच पुढे २०१६ च्या आर्चरीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ संघात त्याला संधी मिळाली आणि आता टोकीयो येथे होत असलेल्या जागतिक आॅलंपिक स्पर्धेमध्ये भारतासाठी ‘पदका’चा अचूक वेध घेण्यासाठी प्रवीण सज्ज झाला आहे.
‘परिश्रम’ व ‘एकाग्रता’ या गुणांनी आपण कुठल्याही परिस्थितीवर मात करु शकतो. ब-याच वेळा प्रतिकूल परिस्थिती माणसाचा आत्मविश्वास नाहीसा करते. अशावेळी नेहमी आशावादी राहून अनुकूल परिस्थिती निर्माण करता येऊ शकते यापेक्षा दुसरे कोणतेच उदाहरण रेवती वीरमणि व प्रवीण जाधव यांच्याकरिता देता येणार नाही. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आयुष्यातील आव्हानांचा स्वीकार करणारे ही दोघं म्हणजे स्वतःतील आत्मविश्वास व परिश्रमाच्या बळावर प्रत्येक कठीण कार्य सोपं करीत गगन भरारी घेत देशाचे नाव लौकीक करण्यास सज्ज आहेत.
रेवती वीरमणी व प्रवीण जाधव यांच्यासह २३ जुलै पासून सुरू होत असलेल्या जागतिक आॅलंपिक स्पर्धेमध्ये भारतीय संघातील सर्व खेळाडू उत्तम कामगिरी करून भारताला आणि आपल्याला गौरन्वित करणार आहेत करीता आपण सर्वांचे कौतुक, अभिनंदन व मन:पूर्वक शुभेच्छा…..!!