By : Mohan Bharti
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेची आषाढी यात्रा कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्राथमिक स्वरुपात होत आहे. यामुळे यंदाच्या वर्षी बंदोबस्तासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कोरोना चाचणी करुन निरोगी पोलीसच आषाढीचा बंदोबस्त करणार आहेत, अशी माहिती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिक्षक विक्रम कदम यांनी दिली.
आषाढी यात्रा भरली तरी गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून जिवीतहाणी होऊ नये. गर्दीमुळे चेंगरा चेंगरी होऊ नये. वारकऱ्यांची वारी सुरक्षित व्हावी, यासाठी हजारो पोलीसांचा बंदोबस्त पंढरपुरात लावण्यात येतो. आता कोरोना संसर्गजन्य रोगामुळे आषाढी यात्रा मोजक्याच भाविकात होत आहे. तरीही पंढरपुरात गर्दी होऊ नये, यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यात हजारो पोलीसांचा बंदोबस्त लावण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील भाविकांना पंढरपुरात येण्यापासून रोखण्यासाठी तीन स्तरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा हद्द, तालुका हद्द व शहर हद्दीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.