By : Shankar Tadas
कोरपना :
अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने युवकाला जीव गमवावा लागला. ही घटना 17 जुलैला रात्री 10. 30 वाजता आसन खुर्दच्या नाल्याजवळ घडली. प्रशिक सुरेश शेंडे ( 23 ) रा. आसन खुर्द असे मृतक युवकाचे नाव आहे. तो नांदाफाटा येथे मावशीच्या घरी जेवण करून गावी परतत असताना अगदी गावाजवळ त्याची दुचाकी ट्रॅक्टरला धडकली. डोक्याला गंभीर दुःखापत झाल्याने तो तिथेच पडून राहिला. ट्रॅक्टर पिपर्डा येथे पसार झाले. ग्रामस्थांना कळताच त्वरित उपचारासाठी हलवत असताना त्याचा प्रशिकचा मृत्यू झाला. गावलगतच्या नाल्यात मधुकर किन्नाके यांच्या शेताजवळ जेसीबीने वाळूचा अवैध उपसा करून तीन ट्रॅक्टरने वाहतूक सुरू होती. त्यापैकी पिपर्डा येथील तिखट यांचे ट्रॅक्टर आसन खुर्द येथे रेती टाकून पुन्हा रेती आणायला जात असताना अनपेक्षितपणे ट्रॅक्टर समोर आल्याने दुचाकी धडकली.
गडचांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकमालक तिखट याला अटक केली असून ट्रॅक्टर जप्त केला आहे. अगदी गडचांदूर – कोरपना राज्य मार्गालगत जेसीबीने उपसा करण्याची हिम्मत केली जात असेल तर हे तालुका प्रशासन झोपेत आहे किंवा झोपेचे सोंग घेऊन असल्याचेच लक्षण आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.