आयुष्य उध्वस्त करणारी लाट ..
तरुण-तरुणींच्या आयुष्यातील कॊरोनापेक्षाही भयंकर , जीवघेणी आणि आयुष्य उध्वस्त करणारी कोणती लाट असेल तर ती आहे स्पर्धा परीक्षेची लाट . यूपीएससी एमपीएससी आणि अशा इतर अनेक जीवघेण्या स्पर्धात्मक परीक्षा .
कारकून बनविणाऱ्या फॅक्टरया.!
हजारो-लाखो युवा युवतींचे मानसिक संतुलन बिघडविणाऱ्या या परीक्षा बंद करणे केव्हाही योग्य ठरेल . कारण या सर्व परीक्षा उच्च दर्जाचे कारकून तयार करण्याऱ्या फॅक्टऱ्या आहेत . साधा कारकून आणि आयएएस / उपजिल्हाधिकारी हे सुद्धा उच्च दर्जाचे कारकूनच की . फरक काही नाही .
९९-९९% नापास ..
या परीक्षेला बसणाऱ्या युवक युवतींची आकडेवारी जर पाहिली तर थक्क होऊन जाल . परीक्षा तीन टप्प्यात होते . पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा , मुलाखत आणि शेवटी मेरीट लिस्ट . एका पाहणीनुसार एमपीएससी पूर्वपरिक्षेकरिता एकूण ३, ६० ,९९० उमेदवार बसतात . त्यातील मुख्य परीक्षेला ६,८२५ उमेदवार पास केले जातात .त्यातील १,३२६ मुलाखतीला येतात . त्यामधून ४२० उमेदवारांची निवड होते . एकूण ३,६०, ५७० उमेदवार नापास होतात . म्हणजेच ९९-९९ % उमेदवारांवर अपयशी म्हणून शिक्का मारला जातो .
भयंकर गुणोत्तर …
परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येकाला वाटते की तो उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस उपअधीक्षक होणार की ज्या पदांसाठी फक्त पन्नास ते शंभर इतक्याच जागा असतात . आपण फॉर्म भरणारे उमेदवार आणि उपलब्ध पदे यांचे गुणोत्तर पाहिल्यानंतर किती भयंकर परिस्थिती आहे हे आपल्या लक्षात येते .
विद्यार्थ्यांचा वर्गभेद…
आता ही जी विद्यार्थी मंडळी असतात त्यांच्यातही वर्गभेद हा सुरुवातीपासूनच तयार होतो . यूपीएससी करणारे विद्यार्थी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याला तुच्छ लेखतात . राज्यसेवा एमपीएससी करणारे विद्यार्थी साधी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याला तुच्छ लेखतात . म्हणजेच अभ्यास करतेवेळीच त्यांची एकमेकांबद्दलची तुच्छतेची भावना तयार होते आणि ती निवृत्त होईपर्यंत तशीच राहते . नव्हे ती दिवसेंदिवस जास्त क्रूर होत जाते . एकाच लायब्ररीमध्ये बसून हे भावी अधिकारी एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत . तिथेही त्यांची गटबाजी तयार होते .
क्लासेसचा प्रचंड मोठा धंदा …
गेली कित्येक वर्षे यूपीएससी एमपीएससीच्या क्लासचा धंदा तुफान चालू आहे .जो तो उठतो आणि क्लास काढतो . क्लासचे पीक जोरात चालू आहे . असे क्लाससेस म्हणजे आजच्या तारखेचा सर्वात मोठा आर्थिक स्कॅम आहे . तरुणांना स्वप्नाच्या दुनियेत घेऊन जाऊन त्यांना अक्षरशः कफल्लक करण्याचे महापाप हे कोचिंगवाले करीत आहेत . त्या क्लास चालकांकडे ना सरकारचे लक्ष ना इन्कम टॅक्सवाल्यांचे . प्रचंड , प्रचंड पैसा आहे या तथाकथित क्लास संस्कृतीकडे . एमपीएससी साठी पुणे हे हब आहे तर यूपीएससीसाठी दिल्ली हे हब आहे . लाखोंची फी देऊन ना नोकरीची हमी ना सुरक्षित जीवनाची हमी . नुसतेच बोलबच्चन क्लाससेस .
पानभर जाहिराती…
एमपीएससी यूपीएससी परीक्षेचा निकाल लागल्यावर वर्तमानपत्राच्या संपूर्ण पान भरून आलेल्या करोडोच्या जाहिराती पहा .
धंदेवाईक दूरदृष्टी ….
एका टॉपर विद्यार्थ्यावर चार ते पाच क्लासेसने केलेला दावा हा काय प्रकार आहे ? एक विद्यार्थी क्लास शोधत शोधत त्या क्लासच्या कार्यालयात जातो . त्याठिकाणी गेल्या गेल्या त्याची व्यक्तिगत माहिती आणि फोटो घेतला जातो . मग त्या विद्यार्थ्याने त्या क्लासमध्ये ऍडमिशन घेऊ अथवा न घेऊ . लगेचच तो त्यांच्या क्लासचा तथाकथित अधिकृत विद्यार्थी होऊन जातो . तो जर मुलगा चुकून पास झाला तर तो आमच्या क्लासचाच विद्यार्थी आहे म्हणून क्लासवाल्याना भविष्यात जाहिरात करता यावी ही त्यामागची शुद्ध धंदेवाईक दूर ” दृष्टी “!
श्रमाला कमी लेखणे…
गावागावातील , खेड्यातील मुले मुली शेती विकून , गहाण ठेवून क्लासची फी भरतात . सहा-सात वर्षे अभ्यासाची खर्डेघाशी करून त्यांना ‘ ‘स्व ‘ ची ओळख काही होत नाही . क्लासवाला आपला दरवर्षी लाखो रुपयांची फी घेतच असतो . आमच्या इथे मुलांना श्रमापेक्षा आरामदायक खुर्चीचेच जास्त आकर्षण असते , ओढ असते . आमच्या संस्कृतीत श्रम करणाऱ्याला जाणीवपूर्वक कमी लेखण्यात आले आहे .
खुराडी असलेल्या लायब्ररी …
खेड्यापाड्यातील मुले पुण्यासारख्या शहरात येतात . कोणत्यातरी चाळीत फ्लॅटमध्ये दाटीवाटीने राहतात . खुराड्यासारख्या असलेल्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतात . आर्थिक अडचणीमुळे कोणतेही पौष्टिक जेवण न घेता वडापाव किंवा स्वस्तात मिळणारा डबा घेऊन पोट भरतात . पुण्यातल्या अप्पा बळवंत चौक या भागात लायब्ररीचा नुसता सुळसुळाट झाला आहे . त्याची भरमसाठ फी . बऱ्याच लोकांनी त्यांच्या फ्लॅटचे रूपांतर लायब्ररीमध्ये करून हजारोंचा धंदा सुरू केला आहे . लाखो-करोडो रुपयांचा झेरॉक्सचा धंदा जोरात वाजत गाजत चालू आहे .
आयता पगार खाणारी मंडळी …
या कोरोनाच्या काळात यूपीएससी संपूर्ण देशात परीक्षा घेऊ शकते तर एमपीएससीला अशी कोणती धाड भरली आहे . गेली दोन-तीन वर्षे एमपीएससी बोर्डातील अधिकारी-कर्मचारी फुकटचा हजारो रुपयांचा पगार घेऊन खुर्च्या गरम करायला बसले आहेत का ? तुमची कसली स्वायत्त संस्था हो ? तुम्ही जर सरकारला जाब विचारू शकत नाही तर तुमचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फायदा काय ? सरकारचे पोपट म्हणूनच काम करणार का ?
बंद करा आता …
आमची महाराष्ट्र सरकारला एक नम्र विनंती आहे की हे एमपीएससी आयोग बंद करावे . सर्व उमेदवारांची कारकून या एकाच पदासाठी एकच परीक्षा घ्यावी . त्यानंतर त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार पदोन्नती देत रहावी . निवृत्त होईपर्यंत त्याला दोन तीन वर्षासाठी उपजिल्हाधिकारी करावे .
पोलीस भरती सुद्धा पोलीस शिपाया पासून सुरु करावी त्याच्या योग्यतेवर तो निवृत्त होईपर्यंत पोलीस अधीक्षक पदापर्यंत कसा जाईल याची आखणी करावी . त्या पदावर तीन चार वर्षे काम करू शकेल अशी व्यवस्था करावी .
इंग्लंडसारख्या देशात आयपीएस / डी.वाय.एस .पी .सारखे कोणतेही सरळ भरतीचे मोठे पद नाही . ते सरळ पोलीस शिपाई म्हणून भरती करतात . त्यानंतर त्याच्या गुणवत्तेवर तो पोलिस आयुक्त पदापर्यंत जातो ही त्यांची यंत्रणा आहे .
बिघडलेले सामाजिक संतुलन …
एमपीएससी यूपीएससी सारख्या जीवघेण्या स्पर्धेमुळे सामाजिक संतुलन बिघडत आहे . घरच्या दबावापोटी आणि सामाजिक स्टेटसपायी लाखो तरुण मुलामुलींचे आयुष्य बेचिराख होत आहे .
भ्रष्ट नोकरशाही …
एमपीएससी यूपीएससीच्या अधिकाऱ्यांनी असा काय दिवा लावला आहे की ज्याने राज्य आणि देश प्रगतीपथावर गेला आहे ? देशात राज्यात हजारो लाखो अधिकाऱ्यांपैकी एखादाच टी. एन. शेषन , ज्युलियस रिबेरो , गो .रा . खैरनार इत्यादी यासारखे सामाजिक बांधिलकी असणारे अधिकारी तयार होतात . बाकी या ना त्या मार्गाने भ्रष्टच आहेत . आम्ही राजकीय नेत्यांना नावे ठेवतो की ही मंडळी किती भ्रष्ट आहेत . परंतु खरे भ्रष्ट ही नोकरशाही मंडळीच आहे . नोकरशाहीमुळेच देश भ्रष्ट झाला आहे .
प्रसिद्धीचा सोस …
आजचे आयएएस आयपीएस हे काही विचारायलाच नको . सगळे प्रसिद्धीला हपापलेले . एखादा आय ए एस बदली झाल्यावर दुसऱ्या विभागाचा चार्ज घेताना संपूर्ण मीडिया घेऊन जातो तर एखादा आयपीएस सतत मीडियाच्या संपर्कात राहून बोलबच्चन करून तरुण तरुणांना मार्गदर्शन करीत असतो . मूळ महत्वाचे सरकारी काम राहिले बाजूला .
निवृत्तीचे वय पन्नासच …
सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे असा आग्रह वर्षानुवर्षे त्यांच्या युनियनमार्फत चालू आहे . कशाला हवे निवृत्तीचे वय 60 वर्षे ? आमचे स्पष्ट मत आहे की , निवृत्तीचे वय ५० वर्षे करा . ५० वर्षापर्यंतच कामाचा जोश असतो . त्यानंतर तो अधिकारी / कर्मचारी निवृत्तीचे दिवस , महिने , वर्षे मोजण्यातच दिवस काढतो . आणि त्यालाच सरकारी काम म्हटले जाते . या स्टेजला आलेला कोणताही अधिकारी सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित धडाकेबाज निर्णय घेत नाही . यांची बॅटिंग फक्त बॉल अडविण्यापूर्तीच . सामाजिक बांधिलकी असणाऱ्या चांगल्या निर्णयाचे चौकार-षटकार यांच्याकडून अपेक्षित नाही . मग कशाला खुर्च्या गरम करीत बसता ? तुम्ही गेल्याशिवाय नवीन मुलांना नोकऱ्या मिळणार कशा ? निवृत्तीचे वय पन्नास वर्षेच पाहिजे . प्रस्तुत लेखाच्या लेखकाने वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे याची कृपया नोंद घ्यावी .
सरकारी नोकऱ्या कमी करा …
शासनाला आणखी एक विनंती कराविशी वाटते . आता सरकारी नोकऱ्या कमी करा . कितीही स्टाफ वाढविला तरीही सर्वसामान्य जनतेची सरकार दरबारी ज्या संथगतीने कामे होतात ती त्याच गतीने होणार आहेत .
जबाबदार कोण ?…
राज्याच्या एकूण महसुलाच्या अर्ध्यापेक्षा जास्त वाटा हा पगार आणि पेन्शन यावरच खर्च होतो . कसला विकास आणि कसले काय ? त्याच घाणीत जगतोय , त्याच रस्त्यावरील खड्ड्यात पडून जीव जातोय . या सर्व बजबजपुरीला जबाबदार असणाऱ्या उच्च अधिकाऱ्याचे काय जाते ? काहीही नाही .
सर्वात सुखी पगारदार मंडळी …
कोरोनाच्या काळात सर्वात सुखी हीच पगारदार मंडळी आहेत . काम करा अथवा करू नका महिन्याला तुमच्या बँकेच्या खात्यात पगार न चुकता पडत आहे . तुम्ही तो पगार एटीएम सेंटरच्या बाहेर उभे राहून मस्त हसत हसत काढत आहात . तुम्हाला फक्त तुमच्या कुटुंबाची चिंता . देश , समाज गया भाड मे .
चुकलास मित्रा …
पुण्याचा स्वप्नील लोणीकर तू चुकलास मित्रा . तुझे व्यक्तिमत्व इतके हळवे आणि परिस्थितीला घाबरणारे असेल असे वाटले नव्हते . तुझी तर अधिकारी म्हणून निवड होणारच होती . आत्महत्येची मानसिकता असलेली व्यक्ती गरीब जनतेला कोणता न्याय देणार होती ? तुझ्या आत्महत्येचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही . कारण तुझ्या अचानक जाण्याने तुझ्या घरच्यांचे काय हाल झाले असतील हे तुला कसे कळणार रे बाबा ?