‘IMD’ म्हणजे एकदम फोकनाड डिपार्टमेंट’ अशी सध्या हवामान विभागाची इमेज बनली आहे. सांगते एक अन होते एक. भारत सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून जवळपास दर महिन्यालाच उपग्रहामागून उपग्रह आकाशात सोडत असते. पण त्याऊपरही शेतकऱ्यांना हवामानाविषयी अचूक माहिती मिळत नसेल तर, त्या संशोधन आणि टेक्नॉलॉजीचा काय फायदा. शेतकऱ्यांसाठी हवामान खाते सर्वकाही आहे. त्यांच्या अंदाजावर डोळे मिटून विश्वास ठेवतो. त्यानुसार शेतीचे नियोजन करतो. पण चुकीच्या तसेच सदोष अंदाजामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. अनेक देशांमध्ये हवामानाविषयी बिनचूक व सटिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आणि तेच घडतेही. हे कृषिप्रधान देश असलेल्या भारतात का होत नाही. इतके हुशार आणि तज्ज्ञ लोक असतानाही.
आज करोडो लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांचा उदरनिर्वाह, अर्थचक्र, भविष्य सर्वकाही शेतीच्याच भरवश्यावर असते. अशावेळी त्यांना अचूक माहिती आणि मार्गदर्शनाची गरज आहे. दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. पाऊस नेमका केव्हा येईल, त्यात खंड पडेल काय. किती दिवसांचा खंड असेल इत्यादींविषयी आगाऊ सूचना देणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थातच अचूक टेक्नॉलॉजी हवी आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, यावर्षी सरासरीच्या शंभर टक्के पाऊस येणार आहे. भविष्यात तो येईलही. पण गरज असताना येणार नसेल तर, त्याचा काहीच उपयोग नाही.
इजरायलमध्ये वर्षाला केवळ दीडशे ते दोनशे मिलिमीटर पाऊस पडतो. पण तरीही तो देश धनधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. आपल्या भारतात चित्र एकदम याऊलट आहे. विदर्भाचाच विचार केल्यास इथे दरवर्षी ९०० ते १००० मिलिमीटर पाऊस सांडतो. मात्र नियोजनाअभावी अख्खं पाणी वाहून जाते. केंद्र व राज्य सरकारने या दिशेने गंभीर प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ कृषिप्रधान देश असल्याचा गवगवा आणि शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजे. आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, हे सांगायला नको. दिवसरात्र काबाडकष्ट करूनही पायात चप्पल आणि अंगावर शर्ट विकत घेता येत नाही. सरकारच्या अजेंड्यावर शेती व शेतकऱ्यांना प्राथमिकता असणे काळाची गरज आहे. ते होत नाही म्हणूनच ७३ वर्षे लोटूनही शेतकरी दुर्लक्षित जीवन जगतो आहे. शेतकरी जगला तरच आपण सर्व जगणार आहोत, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे…
शब्दांकन : नरेंद्र चोरे