—————————————— लोकदर्शन 👉 मोहन भारती
*◼️३१ ते ५० वयोगटातील मृतांच्या संख्येत वाढ*
——————————————
मुंबई : करोनामुळे केवळ वृद्ध आणि अतिव्याधिग्रस्त रुग्णांचाच मृत्यू होतो, या धारणेला दुसऱ्या लाटेने पूर्णपणे चुकीचे ठरविले. गेल्या तीन ते चार आठवड्यांमध्ये धडधाकट, नियमित व्यायामाने शरीरयष्टी कमावलेले, आरोग्यदक्ष असलेले तिशी-चाळिशीच्या उंबरठ्यावरील तरुण अचानक मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे राज्यातील अनेक भागांसह देशात दिसत आहेत.
जलदगतीने वाढणारी संसर्गाची तीव्रता, रुग्णालयात दाखल करण्यास होणारा उशीर आणि दुर्लक्ष झालेले अतिस्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार यामुळे राज्यात ३१ ते ५० वयोगटातील करोना मृतांचे प्रमाण पहिल्या लाटेच्या तुलनेत या वेळी वाढल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले. बाधितांमध्येही सर्वाधिक म्हणजे ४० टक्के प्रमाण याच वयोगटात आहे.
पहिल्या लाटेत ३१ ते ५० वयोगटातील बाधितांची संख्या अधिक असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित होते. काहीच रुग्णांना तीव्र लक्षणे होती. आता बाधा झाल्यानंतर संसर्गाची तीव्रता जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे काहीच दिवसांत रुग्णांच्या फुप्फुसांवर संसर्गाचा परिणाम होऊन लक्षणे तीव्र होत आहेत. परिणामी मृतांची संख्याही काही प्रमाणात वाढली आहे. एकूण टक्केवारीत मात्र हे प्रमाण कमीच आहे.या लाटेत तरुणांमधील मृत्यूचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. परंतु याबाबत अजून सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.