——————————————दि 9 /4/2021 मोहन भारती
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्राची परिस्थिती आणखीन चिंताजनक होताना दिसत आहेत. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने विक्रमी वाढत होत आहे. दिवसाला ५० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. जगातील कोरोना यादीत महाराष्ट्राने जर्मनीसारख्या मोठ्या राष्ट्राला तर मागे टाकलेच आहे. त्याचबरोबर आता नव्या कोरोना रुग्णवाढीत ब्राझील, अमेरिका सारख्या बलाढ्य राष्ट्रांनंतर महाराष्ट्राचा नंबर लागला आहे. त्यामुळे जगातील यादीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. ही महाराष्ट्रासाठी अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
कोरोना संकटाच्या सुरुवातीलपासून अमेरिका केंद्रस्थानी आहे. अमेरिकेत कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्याप्रमाणे ब्राझीलमध्ये देखील कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. माहितीनुसार काल दिवसभरात ब्राझीलमध्ये ४ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण दगावले. अशी भीषण कोरोनाची परिस्थिती असलेल्या देशांनंतर महाराष्ट्राचा आता नंबर लागला आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात ५९ हजार ९०७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ब्राझीलमध्ये ८२ हजार ८६९ रुग्णांची वाढ झाली असून नव्या रुग्णवाढीच्या संख्येत जगातील यादीत ब्राझील पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत ६२ हजार २६८ रुग्णांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. याच आकेडवारीनुसार महाराष्ट्राने जगातील कोरोना यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतल्याचे दिसत आहे.