मोहन भारती
सिने अभिनेते रजनीकांत यांना 2019 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वोच्च सन्मान समजला जातो.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.त्यानिमित्ताने एक नजर शिवाजी ते रजनीकांत, या प्रवासावर.ही वर्षांतली तीच वेळ जेव्हा त्यांचा सिनेमा रिलीज होतो आणि त्यांचे फॅन्स भक्त बनून जातात, त्यांच्या पोस्टर्सचा दुग्धाभिषेक करतात, त्यांची पूजा करतात आणि त्यांच्या सिनेमाला चक्क पहाटेपासून गर्दी करतात.
एवढं काय हे रजनीचं याड? जाणून घेऊ या त्यांच्याबद्दलच्या या 12 महत्त्वाच्या गोष्टींमधून.
1. जिजाबाई आणि रामोजीराव यांच्या 4 मुलांतील सर्वात लहान मुलगा म्हणजे शिवाजीराव होय. 12 डिसेंबर 1950ला बेंगलुरूमध्ये शिवाजीराव यांचा जन्म झाला. हेच शिवाजीराव पुढे जाऊन रजनीकांत बनले.
2. रजनीकांत पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर घर चालवणं कठीण होतं. रजनीकांत यांनी घर चालवण्यासाठी हमाली केली. सुपरस्टार बनण्यापूर्वी रजनीकांत बस कंडक्टर होते.
3. रजनीकांत यांचे मित्र राज बहादूर यांनी त्यांचं अभिनेता बनण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं. बहादूर यांनीच त्यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायला सांगितलं. दोघे आजही मित्र आहेत.
4. बालचंद्र यांचा सिनेमा ‘अपूर्वा रागनगाल’ हा त्यांचा पहिला तामिळ सिनेमा होय. यात कमल हसन आणि श्रीविद्या यांच्याही भूमिका होत्या.
5. रजनीकांत यांनी अभिनयाची सुरुवात कन्नड नाटकांतून केली. त्यांनी साकारलेली दुर्योधनची भूमिका गाजली होती.
6. सुरुवातीला नकारात्मक भूमिका केल्यानंतर रजनीकांत पहिल्यांदा नायक म्हणून समोर आले ते एस. पी. मुथुरमन यांच्या ‘भुवन ओरु केल्विकुरी’ या सिनेमातून! या सिनेमानंतर एस. पी. मुथुरमन आणि रजनीकांत यांची जोडी चांगलीच जमली. त्यानंतर दोघांनी एकत्र 25 सिनेमे केले.
7. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला त्यांचा पहिला सिनेमा म्हणजे ‘बिल्ला’ होय. 1978ला आलेला अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ हा सिनेमा याच सिनेमाचा रिमेक होता.
8. रजनीकांत यांनी ‘मुंदरू मूगम’ या सिनेमात तिहेरी भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना तामिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
9. टी रामा राव यांचा ‘अंधा कानून’ हा रजनीकांत यांचा पहिला हिंदी सिनेमा होता. यात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि रिना रॉय यांच्याही भूमिका होत्या.
10. 1985ला त्यांनी 100 सिनेमे पूर्ण केले. ‘श्री. राघवेंद्र रजनीकांत’ हा त्यांचा 100वा सिनेमा होता. त्यात त्यांनी संत राघवेंद्र स्वामी यांची भूमिका केली होती.
11. रजनीकांत यांच्या ‘राजा चायना रोजा’ या सिनेमात प्रथमच अॅनिमेशनचा वापर करण्यात आला होता.
12. रजनीकांत यांनी तामिळ, हिंदी, मल्याळम, कन्नड, तेलुगू सिनेमांसोबतच ‘भाग्य देबता’ या बंगाली सिनेमातही भूमिका साकारली आहे.