By : Shankar Tadas
* नागरिकांच्या तक्रारीला मोजतोय कोण !
कोरपना या आदिवासीबहुल तालुक्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरलेला L&T सिमेंट उद्योग सुरू झाला तेव्हा लोकांना आनंद झाला होता. आता 35 वर्षे लोटली. काळ बदलला. त्यावेळी भुकेल्या पोटासाठी रोजगार महत्वाचा होता. त्यानंतर माणिकगड, मुरली (आता दालमिया ), अंबुजा हे सिमेंट उद्योग तालुक्यात दाखल झाले.
सिमेंट उद्योगाकरिता आवश्यक असलेला मुख्य कच्चा माल म्हणजे काळा दगड. येथे हा दगड भरपूर असल्यामुळे सिमेंट उद्योग आलेत. परिसरातील लोकांना मात्र आता हेच उद्योग डोकेदुखी ठरत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ काही नियम मान्य असेल तरच सिमेंट उद्योगाला परवानगी देते. प्रभावी यंत्रणा वापरून धुळीवर नियंत्रण मिळविता येते. प्रत्यक्षात मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी सुरू होते. हे उद्योग अधिक प्रमाणात रात्री धूळ सोडतात. परिसरात जिकडं तिकडं धुळच धूळ दिसते. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. शिवाय स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. बड्या नेत्यांचा आशीर्वाद पाठीशी असताना ‘इतरांचा लेखा कोण करी’ अशी भूमिका घेतली जाते. आता लोक खवळळे आहेत. आंदोलने, निदर्शने आणि तक्रारी खूप झाल्यात. पुढचे पाऊल टाकण्याची प्रतीक्षा म्हणजे लोकांचा अंत पाहणे होय. नेते आणि अधिकारी आपापले खिसे भरून नागरिकांच्या अडचणी दुर्लक्षित करीत असेल तर सामान्य माणसाला कोणीच वाली नाही, असेच म्हणावे लागेल.