By : Shivaji Selokar, Gadchandur
रोज उठून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची भीती घालू नये. बाकीच्या राज्यात कोरोनाचा क सुद्धा ऐकायला मिळत नसताना महाराष्ट्रातच कोरोना का एवढा फोफावत आहे त्याचा शोध घ्यावा. रोज कॅमेऱ्यासमोर येऊन पोपटपंची करण्यापेक्षा आपल्या पदाला योग्य तो न्याय द्यावा. तुमच्या गोड गोड बोलण्याने राज्यातली परिस्थिती बदलणार नाही. कोरोनासाठी फक्त जनता जबाबदार नाही. सगळं जनतेवर ढकलून तुम्ही हात झाडू शकत नाही. तुमची धोरणं अगोदर तपासा.
लॉकडाऊन केल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होणारे त्याची जबाबदारी राज्य सरकार उचलणार आहे का? गेले पूर्ण वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले. लोकांचा इनकम थांबला. रोजगार गेले, नोकऱ्या गेल्या. शाळांना भरलेली फी शाळा तर सुरू झाल्या नाहीत आणि फी सुद्धा परत मिळाली नाही. फी परत द्यायला लागू नये म्हणून हे ऑनलाईन शिक्षणाचे खूळ काढण्यात आले. त्यातून मुलांना किती फायदा होतोय याचा शोध घेतला का?
लोकांचे कर्जाचे हप्ते थकलेत. आता मार्च महिना चालू आहे. बँका कर्जदारांच्या मागे हात धुवून लागल्यात. २-२ लाख रुपये थकीत आहेत. लोकांनी पैसे कुठून आणायचे? सरकार म्हणून तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या माध्यमातून लोकांना दिलासा दिला? कोरोना वाढेल म्हणून तुम्ही लोकल बंद ठेवताय आणि इकडे बसेस भरून चाललेत, रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक आहे. हॉटेल, डान्सबार सगळं चालू आहे. हा कसला कारभार आहे?
बीळ लिपायचं आणि दरवाजा उघडा ठेवून अंघोळ करायची असा सरकारचा कारभार चालू आहे. सत्तेवर आल्यापासून कोणता असा तिर मारला हे तरी कळू द्या? किती नोकऱ्या, रोजगार उपलब्ध केले? बाहेरचे किती उद्योग राज्यात आणले? देशात जेवढी कोरोना रुग्णांची संख्या आहे, त्यात निम्मा वाटा महाराष्ट्राचा आहे. हे तुमचं कर्तृत्त्व काय? एक केरळ सोडलं तर सर्व राज्यांत कोरोना कंट्रोलमध्ये आहे. मग महाराष्ट्रात असे होताना का दिसत नाही? कधीतरी या प्रश्नाच्या खोलात जावा. आपलं सरकार विकास कामांच्यापेक्षा नको त्या कामांनीच जास्त गाजतेय त्याकडे जरा लक्ष द्या. रोज उठून आम्हाला लॉकडाऊनची भीती घालू नका.