By : Rajendra Mardane, Warora
* तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे निर्देश
वरोरा : कोव्हीडचे संक्रमण शोधून काढण्यासाठी आर.टी.पी.सी.आर. चाचणी केल्या जाते. प्रयोगशाळेद्वारे त्याचे निष्कर्ष कळतात. त्यामुळे तालुक्यात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी २२ मार्चपर्यंत आस्थापना व दुकानात कार्यरत व्यक्तीनी स्वत:ची RTPCR चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी व्यापारी प्रतिनिधी मंडळाला त्यांच्या दालनात आयोजित बैठकीत दिली.
तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या धोक्याचा इशारा असून चिंतेचा विषय असल्याने प्रत्येक नागरिकाने स्वत: सोबत पारिवारिक सदस्यांची व प्रियजनांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे व वेळोवळी सॅनिटायझर वापरणे किंवा साबणाने व्यवस्थित हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. गरजूंनी कोव्हिड प्रतिबंधक लस टोचून घेऊन इतरांना प्रेरित करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी केले होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी याच्या निर्देशानुसार २२ फेब्रुवारी २०२१ ला नोटीस बजावून २३ फेब्रुवारी २०२१ ते ३ मार्च २०२१ पर्यंत केश कर्तनालय/ लाँड्री, किराणा दुकान,फळ/ भाजीपाला / मटन विक्रेता, घरकाम/ धुणीभांडी करणाऱ्या महिला, वर्तमानपत्र वाटणारी व्यक्ती, हॉटेल/उपहारगृह/ पानठेलेधारक, खाजगी वाहन चालक/ ऑटो चालक, हमाल कामगार/ कॅट्रर्स कामगार, खानावळ धारक, सफाई कामगार इत्यादींनी चाचण्या करून घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु अनेक आस्थापने व नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन न करता केवळ देखावा करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर अशा बहाद्दरांवर लक्ष केंद्रित करून कशाचीही तमा न बाळगता कारवाई करून लाखोंचा दंड वसूल करण्यात आला होता. सदर कारवाईचा मुख्य उद्देश हा दंड वसूल करणे नसून नागरिकांमध्ये नियम पालनाबाबत गांभीर्य निर्माण करणे हे आहे, असे त्यांनी नमूद केले होते.
ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ व ४५ वर्षोवरील नागरिकांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कोव्हिड लस पुरविण्यात येत आहे. तालुक्यात वाढत असणाऱ्या कोरोना या आजाराच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी आणि रुग्णांची तात्काळ तपासणी करण्यासाठी वरोरा तालुक्यातील सर्व व्यापारी आस्थापना, दुकाने, सेवा केंद्रे, दवाखाने, कार्यालय इ. मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व व्यक्तींनी आपली आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. दिनांक २२ मार्च २०२१पर्यंत चाचणी न केल्यास ५ हजार दंड आणि या दरम्यानच्या काळात चाचणीचा अहवाल येईपर्यंत व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांनी अति आत्मविश्वास टाळून आजार अंगावर काढण्यापेक्षा प्रशासनाला सहकार्य करीत वैद्यकीय चाचण्या व लस टोचून घेतल्या तर या जीवघेण्या संकटावर हमखास मात करता येईल. चाचण्या करणे हे आपल्यासोबतच इतरांच्याही फायद्याचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासना तर्फे चाचण्या वाढवून रुग्ण शोधण्यावर भर दिला जात आहे. तालुक्यात आनंदवनात रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वरोरा तालुक्याचा आकडा फुगल्यासारखा दिसतो. आनंदवनात अपवाद वगळता सर्वांच्याच चाचण्या झाल्या आहेत. आनंदवन परिसर सील केल्याने शहराशी त्याचा संबंध नाही परंतु कोरोना रुग्ण वाढणार नाही, याची दक्षता घेणे सर्वांचीच जबाबदारी आहे. तालुक्यातील नागरिक व व्यवसायिक यांना जिल्हा व तालुका प्रशासनाकडून वेळोवेळी आवश्यक सूचना देऊनही जागरुक नागरिक वगळता बेजबाबदार व गुर्मीबाज नागरिक अतिआत्मविश्वास बाळगून नियम हेतुपुरस्सर धाब्यावर बसवित असल्याने वरोरा कोव्हिडचे ‘ हॉट स्पॉट ‘ बनत आहे. कोव्हीडची गांभीर्याने दखल घेऊन वेळीच चाचण्या करुन घेणे बेहत्तर अन्यथा सावरणे कठीण होऊन गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
‘ कोव्हिड १९ ‘ साठी देशाचे चाचण्यांसाठीचे धोरण आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याच धोरणानुसार सर्व प्रकारातील वेगवेगळ्या व्यक्तिंची चाचणी केली जात आहे. या मोहिमेला सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. येत्या २२ मार्चपर्यंत आस्थापना, दुकाने व लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येणाऱ्या व्यक्तिंनी उपरोक्त आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. चाचणी न केल्यास त्यांच्यावर ५ हजार रुपये दंड व चाचणीचा अहवाल येईपर्यंत व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय निर्देशांचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.