तांदूळ आता न शिजवताच येणार खाता!; तेलंगणातील शेतकऱ्याचा महत्वपूर्ण शोध

मोहन भारती–
भारत हा तांदुळ उत्पादनातील एक महत्वाचा देश आहे. भारतात सुमारे पाच हजार तांदळाच्या जाती आढळतात. सातत्याने अधिक उत्पादन देणारे आणि पौष्टिक तत्वांनी भरलेले नवे वाण तयार करण्यातही भारतातील वैज्ञानिक आघाडीवर आहेत. त्याचबरोबर तांदळाच्या अनेक जाती स्थानिक शेतकऱ्यांनीही शोधून काढल्या आहेत. असाच एक महत्वपूर्ण शोध तेलंगणातील एका शेतकऱ्यानं लावला आहे. या शोधामुळे आता तांदूळ शिजवून खाण्याची गरज पडणार नाही.

तेलंगणातील करीमनगर येथील एका शेतकऱ्याची शेतीप्रती असलेली आवड, नवा विचार आणि प्रयोगशीलतेनं तांदळाचा हा नवा प्रकार समोर आणला आहे. या शेतकऱ्यानं तांदळाचं असं वाणं शोधलं ज्यामुळे खाण्यासाठी त्याला शिजवण्याची गरज नाही. या तांदळाला काही वेळासाठी केवळ पाण्यात भिजवून ठेवाव लागणार आहे. जर तुम्हाला गरमा गरम भात खायचा असेल तर हा तांदुळ तुम्हाला गरम पाण्यात भिजत ठेवावा लागेल. अन्यथा साध्या पाण्यात भिजवून ठेवल्यासही तो त्याचप्रकारे तयार होतो.

करीमनगरचे श्रीराममल्लापल्ली गावाचे शेतकरी श्रीकांत यांचं म्हणणं आहे की, त्यांना एकदा आसाममध्ये जाण्याची संधी मिळाली, त्या ठिकाणी त्यांना तांदळाच्या अशा वाणाची माहिती मिळाली जो न शिजवताच खाता येतो. यानंतर या शेतकऱ्यानं गुवाहटी विद्यापीठाशी संपर्क साधला आणि तांदळाच्या या अनोख्या प्रजातीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना कळलं की आसामच्या डोंगराळभागात काही आदिवासी जमाती या प्रकारचं धान तयार करतात. ज्याला खाण्यासाठी शिजवण्याची गरज पडत नाही.

फायबरयुक्त तांदूळ

डोंगराळ भागातील जमातींमध्ये या तांदळाला ‘बोकासौल’ नावानं ओळखलं जातं. तांदळाच्या या प्रकाराला प्रकृतीसाठी खूपच गुणकारी मानलं जातं. या तांदळात १०.३७ टक्के फायबर आणि ६.८ टक्के प्रोटीन आहे. या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की, हा तांदुळ गूळ, दह्यासोबत खाल्ल्यास त्याला अप्रतिम स्वाद असतो.

अर्ध्या एकरात ५ पोती तांदळाचं उत्पादन

श्रीकांत यांनी आसाममधील या आदिवासी जमातींकडून या तांदळाचे बी घेऊन आले होते. १२व्या शतकात आसाममध्ये राज्य करणाऱ्या अहम राज्यकर्त्यांना हा बकासौल तांदुळ खूपच आवडत होता. मात्र, नंतर तांदळाच्या दुसऱ्या प्रजातींची मागणी वाढतच गेली. जवळपास विलुप्त झालेल्या तांदळाचा हा प्रकार आपण विकसित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अर्ध्या एकर शेतात त्याची पेरणी केली. श्रीकांत यांना आशा होती की, अर्ध्या एकरात सुमारे ५ पोती तांदूळ होईल. तांदळाच्या इतर जातींप्रमाणेच हे पिकही १४५ दिवसात तयार होते.

या तांदळाचा फायदा काय आहे?

श्रीकांत यांनी म्हटलं की, सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ होत असताना या तांदळाचं महत्व खूपच अधिक ठरलं आहे. कृषी तज्ज्ञ सुभाष पालेकर यांच्यमुळे आपल्याला या तांदळाची शेती करण्याची प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. त्यांनी नैसर्गिक शेतीचा शोध लावला आहे. त्यांनी असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे की, ज्यामुळे रासायनिक किटकनाशकांची गरजच पडत नाही.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *