लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर
आय.एम.ई., अपेक्स मध्ये अपात्र प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागणार
न्यायालयीन प्रलंबित प्रकरणातील नौकऱ्यांबाबत लवकरच निर्णय.
चंद्रपूर:- वेकोली बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत धोपटाळा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला, बिल मंजूरी, धनादेश वितरण, पौनी-2 मधील प्रकल्पग्रस्तांना नौकऱ्या , चिंचोली रिकास्ट प्रकल्प मार्गी लावणे आदी व अन्य विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी वेकोली मुख्यालयाने सर्व बाबिंवर सकारात्मक भूमीका घेत निर्णय घेवू असे आश्वासन पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिली.
वेकोली मुख्यालय नागपूर येथे दिनांक 02 मार्च 21 रोजी हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत वेकोली चे मुख्य प्रबंध निदेशक मनोजकुमार, कार्मिक निदेशक संजय कुमार व प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थितीत होते. यावेळी अहीर यांनी मुख्य प्रबंध निदेशकांना कोळसा खरेदीदार कंपनीकडून त्वरीत करारनामा करुन घ्यावा किंबहुना तांत्रिक दृष्टया एकत्रीकरण करुन प्रकल्पग्रस्तांना बिल मंजूरीद्वारे धनादेशाचे तातडीने वितरण करावे अशा सुचना केल्या. या प्रश्नी लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोजकुमार यांनी दिले.
चिंचोली रिकास्ट प्रकल्पाबाबतही यावेळी चर्चा झाली. यासंबंधात वेकोली अधिकाऱ्यांनी नवीन जमीन एकत्रीकरणाअंतर्गत प्रस्तावित करुन प्रकल्प सुरु करण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगीतले. पौनी-2 प्रकल्पातील प्रलंबित असलेल्या 17 प्रकल्पग्रस्तांच्या नौकऱ्यांविषयक झालेल्या चर्चेत वेकोली अधिकाऱ्यां नी या प्रकरणी कोल मंत्रालयास पत्राद्वारे कळविण्याचे मान्य करुन याबाबत यथावकाश कार्यवाही केली जाईल असे सांगीतले. बैठकित सेक्शन 9 नंतर न्यायप्रविष्ट असलेला कोणताही स्थगनादेश, मनाई हुकुम, वेकोली पार्टी नसलेल्या प्रकरणातील नोकऱ्या खुल्या करण्याबाबत शक्य तितक्या लवकर निर्णय घेतला जाईल असेही वेकोली अधिकाऱ्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले.
रक्तदाब, शुगर, दृष्टीदोष व अन्य कारणामुळे आय.एम.ई. किंवा अपेक्स बोर्ड मध्ये अपात्र ठरलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्यांची शारीरीक सुदृढता विचारात घेवून नौकरी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कार्मिक निदेशक संजय कुमार यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील वेकोली विषयक विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. संबंधित प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आणखी जटील न करता प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा विचार करुन समोपचाराने सोडविण्याची भूमीका वेकोली प्रंबंधनाने घ्यावी अशा सुचना हंसराज अहीर यांनी दिल्या.
या बैठकिस भाजपाचे जिल्हा महामंत्री राजेश मून, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, अॅड. प्रशांत घरोटे, पुरुषोत्तम लांडे, शरद चाफले, प्रफुल देवगडे, सागर काटवले, श्रीनिवास दुडम, कुडे व अन्य प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.