अंगणवाडी सेविका निवडीस
By : Shankar Tadas
चंद्रपूर :
जिल्ह्यात अंगणवाडी सेविका पदाकरिता भरलेल्या अर्जाची यादी 5 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यातून लवकरच पात्र उमेदवारांची निवड होईल. या यादीतील माहितीवर 10 दिवसांत आक्षेप मागितले आहेत. त्यानंतर निवड घोषित होणार आहे. तोवर इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील असून बारावीचे गुण, पदवी, कॉम्पुटर, अनुभव याच निकषावर गुण देण्यात आले असल्यामुळे यावेळी लग्गेबाजांचे काहीही चालणार नाही असेच चित्र आहे. बारावीतील गुणांची अधिक टक्केवारी लाभली त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता असली तरी पदवीधर उमेदवाराला 10 गुण अधिकचे मिळत आहे. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका हे महिला व बालकांच्या दृष्टीने खूप महत्वाचे पद आहे. त्यासाठी विशेष योग्यतेची गरज असते आणि आता गावखेडयात उच्चशिक्षित आणि विशेष योग्यता प्राप्त उमेदवार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. मात्र निव्वळ बारावीतील गुण हाच महत्वाचा निकष असेल तर इतर सर्व उमेदवारांवर अन्याय केल्यासारखे होईल. कोरोना काळात बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्राप्त झाली होती. म्हणून शासनाने टक्केवारीसोबत इतर योग्यतेचे योग्य मूल्यांकन करून अधिक सक्षम उमेदवारांची निवड केल्यास ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास हातभार लागणार आहे.