By : प्रा. राजकुमार मुसणे
झाडीपट्टी रंगभूमीला प्रदीर्घ अशी नाट्यपरंपरा लाभलेली आहे. कष्टकरी, श्रमिक – रसिक प्रेक्षकांचे रंजन व प्रबोधन करणाऱ्या या रंगभूमीवर ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक, विषयावरील नाटकांप्रमाणेच सत्य घटनेवर आधारित ज्वलंत विषयावरील नाटकाचे यशस्वी प्रयोग झालेले आहेत.
चंद्रभागा प्रस्तुत शिवम थिएटर्स नागभीड-वडसा निर्मित, लेखक, दिग्दर्शक, गायक, गीतकार, संगीतकार युवराज गोंगले लिखित , दिग्दर्शित सामजिक कुप्रथेवर भाष्य करणारे ‘ बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकाचा प्रयोग मिंडाळा येथे१० जानेवारीला यशस्वीरित्या संपन्न झाला.
अलक्षित थरकाप उडवणारा सामजिक हृदयस्पर्शी नाटयाशय, गतिमानता, कलावंतांचा सहजाभिनय यामुळे हे नाटक अप्रतिम होते. समाजातील विदारक कुप्रथेवर भाष्य करणारे, महिलांचा भाड्याने व्यवसाय असण्याच्या पशूसम नारीबाजार सारख्या अत्यंत लांच्छनास्पद प्रकार दर्शविणारे नाटक म्हणजे बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको होय.
या नाटकाची कथा ही सत्यघटनेवर आधारित व वास्तवदर्शी आहे. मध्यप्रदेशातील शिवपुरी भागात आजही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही बायकांचा बाजार भरवून जनावरांसारखी त्यांची बोली लावली जाते. भाड्याने विक्री केली जाते,ही अत्यंत लांच्छनास्पद व घृणास्पद बाब या नाटकाच्या निमित्ताने प्रयोगाशील रंगकर्मी युवराज गोंगले यांनी उघडकीस आणत समाजात सजगता निर्माण केली, त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद.
नाटकाची सुरुवातच गजवंदनेने पारंपारिकतेपेक्षा *किरपेचं दान उधळावं.. उधळावं जी..देवा तुम्ही यावं.. तुम्ही यावं जी’ अशी रंगदेवता नटेश्वराला आर्त हाक देणाऱ्या विलक्षण नांदीने होते. नांदी ऐकतांना आजवर ऐकलेल्या नांदीपेक्षा या नांदीचा बाज झाडीपट्टीच्या पारंपरिक गायल्या जाणाऱ्या नांदीपेक्षा वेगळा असल्याने प्रारंभापासूनच विलक्षण अभिनवता आणून दिग्दर्शकाने वेगळी वाट चोखाळली आहे. तद्वतच युवराज गोंगले यांची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे उदघाटनीय कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतानंतर आयोजक नाट्य मंडळास पुरोगामी विचाराची रुजवणूक म्हणून सन्मानार्थ ते भारतीय संविधान आणि एक मिठाईचा पुडा देत नव्या पायंडयाने झाडीपट्टीत वेगळेपणं सिद्ध केले आहे.
मध्यप्रदेश राज्यातील शिवपुरी जिल्ह्यातील सत्यघटनेवर आधारित कथानक असल्याने नाटककार- दिग्दर्शकाने तशी प्रसंगाची निर्मिती केली आहे. अबूजमाडिया जमातीच्या बाजारात भाड्याने देण्यात येणाऱ्या महिलांच्या प्रथेच्या अनुषंगाने केलेली समर्पक मांडणी प्रेक्षकांना अवाकपणे अंतर्मुख करणारी आहे. नाटक काजळी या प्रमुख पात्राच्या घटनेशी निगडित असून तिच्या जीवनातील व्यथा -वेदनांचे , दु:खांचे प्रत्ययकारी दर्शन नाटककाराने विविध प्रसंगातून घडविले आहे.
काजळीचे सारसवरील प्रेम , स्वार्थापायी बाप आणि भाऊचा काजळीच्या लग्नास विरोध, मारहाण, जखमी ते बेहोश करतात.काजळी स्वतःला बाजारात विकायला तयार नसते पण तिचा बाप आणि भाऊ या ‘धडीचा’ च्या बाजारात तिला बेहोशीचे औषध देऊन विकतात.एक किंवा दोन वर्षासाठी भाड्याची बायको म्हणून केवळ 10 रु पासून ते 100 रु पर्यंतच्या साध्या स्टॅम्प पेपरवर कराराने स्त्री भाड्याने देण्याच्या कुप्रथेला ‘धडीचा’ संबोधतात.या नाटकाची कथा नायिका काजळी हलमे या तरुणीच्या आयुष्याची व्यथा व संघर्ष विशद करणारी आहे. दलाल तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून लाखो रु कमावतो. कित्येक लोक तिला उष्टी करून जातात. यातून ती गर्भवती असते. पण शेवटी हे मुल कोणाचं? तिने आपल्या या पोराला बापाचं नाव म्हणून कोणाचं नावं लिहावं? हा तिचा गंभीर प्रश्न समाजाला ती विचारते.
सी.बी.आय. ऑफिसर बनून आलेल्या प्रियकराला ती नकार देते. किंबहुना ज्या स्त्री च्या पोटातून जन्म घेतला, जिला लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती आणि अंबा म्हणून पूजा केली जाते त्याच स्त्रीचा असा बाजार जर आज ही मांडला जात असेल आणि आजवर ज्या ही अनिष्ट रूढी, प्रथा आणि परंपरा इथल्या समाजाने स्त्रियांवर लादल्या, मग ती
देवदासी प्रथा असो, केशवपण असो की सतीप्रथा या सर्व च प्रथा स्त्रीवरच का? अशा सामाजिक भेदभाव उघड करीत होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ‘काजळी’ बंड पुकारते. वास्तव घटनेची निगडित विषय नाटककाराने हाताळला आहे.
रूपवान काजळी वयात येताक्षणी तिला तिचा भाऊ बाप धडीचाच्या बाजारात नेण्यासाठी प्रवृत्त करतात काजळीने विरोध करताक्षणी तिला बेदम मारहाण करतात प्रसंगी तिला बेहोषीचे औषध देऊन धडीचा च्या बाजारात उतरविले जाते. हतबल झालेली काजळी मात्र पोटतिडकिने भाऊ-वडिलांना समजावते विनवणी करते दयामाया करते पण त्यांच्या न ऐकण्याने प्रसंगी मुलगी ही घराची इज्जत आहे आणि भाड्याची बायको म्हणून तुम्ही तिला विकता तर तुम्ही नामर्द आहात अशी खडसावते.तरीही तिचं काहीही ना ऐकता बाप आणि भाऊ जबरदस्तीने तिला धडीचा च्या बाजारात उभे करतात. मुलींना वाटेल तसे वापरतात तिच्या शरीराची भोग वस्तू म्हणून उपभोग घेतला जातो .पशु प्रमाणे तिला भाड्याने दिले जाते या सर्व विदारतेवर काजळी विद्रोह पुकारते .परंतु तिच्या अन्यायाला वाचा फूटण्याआधीच बाप आणि भाऊ तिची विक्री करतात.
चंचल ठाकूर आणि बेनीराम ठाकूर धडीचा च्या बाजारात मुलींच्या विक्रीच्या व्यवसायात सक्रिय असून यातून त्यांना आर्थिक लाभाबरोबर शारीरिक सुखही प्राप्त होत असल्याने पूर्णतः गुंतलेले असतात. धडीचा च्या बाजारातून मादक ,मोहक स्त्रियांना केवळ नाममात्र स्टॅम्प पेपरच्या करारावर विकत घेणे . त्यांचा पूर्णतः आस्वाद घेऊन अफगाणिस्तानासारख्या पर प्रांतात पाठवण्याचा गोरखधंदा तेजीत असतो. मटारु ची पोरगी केवळ २० हजारात मोमनारूची पोरगी २५ हजारात , हरणीसारखी काजळी आणि लुसलुशीत ससा संबोधली गेलेली तिची अल्लड बहीण पारिजा या दोघींना ही पाच लाखात एक वर्षाकरिता विकली जाते. पण विकणारे बाप भाऊ अडाणी असल्याने स्टॅम्प पेपर वर सरळ पाच वर्षाचा करार केला जातो आणि त्यांना ठाकुरांकडून फसवलं जातं.
धडीचा या कुप्रथेच्या नावाखाली महिलांच्या बाजारांचे हे सत्र अविरत सुरूच असते पण यामुळे या कुप्रथेचा अतिरेक दिवसेंदिवस वाढत जातो आणि काजळी सारख्या अस्वस्थ मुलींच्या मनात विद्रोह पेट घेऊ लागतो आणि काजळीवर प्रेम करणारा सी बी आय चे प्रशिक्षण घेत असलेला सारसकांत प्रशिक्षणानंतर सी बी आय अधिकारी म्हणून परततो. त्याच्यावर धडीचा च्या नावाखाली बेपत्ता केल्या गेलेल्या चोवीस मुलींना शोधून त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारातून त्यांना मुक्त करण्याची जबाबदारी देण्यात आलेली असते. बहात्तर एन्काऊंटर, सतरा पोलीस अधिकारी व सात भ्रष्ट शिपायाला निलंबित करण्याचा रेकॉर्ड असल्याने अनेकांमध्ये थरकाप सुटतो. असा सारसकांत या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून दखल घेत वाचा फोडतो.
गुप्त अधिकारी सीबीआय इन्स्पेक्टर सारसकांत ठाकूर यांच्या काळया कारनाम्याचा पर्दाफास करतो. त्याला सहकार्य करणारा पोलिस अधिकारी दरोगा केसरीमल की ज्याने २४ एन्काऊंटर केलेले आहेत या कामात मदत करतो.
काजळीवर तिचा भाऊ व वडील दबाव टाकून बाजारात उभे राहण्यासाठी जबरदस्ती करतात. तिची होणारी घालमेल, व्याकुळता ,आंतरिक सल ,व्यथा,वेदना ममता गोगले यांनी नेमकी प्रकट केली आहे. थकलेली, पोटात गर्भ वाढत असतानाची काजळी तिची व्यथा डोळे पाणवणारीच.
सर्वप्रथम परंपरा ह्या फक्त बायकांसाठीच सती देवदासी या केवळ बायाच. जात पंचायत सुद्धा बायांच्याच विरोधामध्ये. मुलगी लग्ना आधी गरोदर असली तर तिला सजा म्हणून जात पंचायतिचे लोक मातीत मुततात आणि तिला मुतलेल्या मातीच्या भाकरी खावे लागते 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला असेल तर खरं खोटं तपासायला जात पंचायत चे लोक त्या मुलीच्या लघवी च्या ठिकाणी कोंबडीचे अंडे टाकून तपासतात.
मुलींच्या हातून चुका झाल्या तर तिला अत्यंत किळसवाणी शिक्षा देणारी जात पंचायत आणि या सर्व महिला विरोधी व्यवस्थेवर रणरागीणी बनणारी अग्रगामिनी काजळी थुंकते आणि आपला विद्रोह उजागर करते. अशा कुप्रथेच्या माध्यमातून एकूणच स्त्रीवर होणाऱ्या विविध अत्याचाराचे ही निर्देश नाटककाराने या नाटकात चपखलपणे केले आहे. निर्भया हत्याकांड, खैरलांजी हत्याकांड, बीड , अहमदनगर, ओरिसा च्या रोजच्या होणाऱ्या घटना आणि कलकत्ता येथील डॉक्टर वर झालेल्या अत्याचारासारख्या विविध घटनांचा उल्लेख करीत स्त्री दुःखांना वाचा फोडली आहे. काजळीचे हे निवेदन ऐकताना मात्र पेक्षागृह अचंबितपणे थक्क होऊन हळहळ व्यक्त करते. भाड्याने दिलेल्या मुलीची गर्भधारणा होते आणि अशा गरोदर मुलींनाही छळले जाते अत्यंत भयंकर विदारकता नाटकातून दर्शविली आहे शिवाय अशा 24 मुलींची भारतातील अनेक शहरासवे भारताबाहेर अफगाणिस्तान आणि दुबईला त्यांची निर्यात करण्यात येते. म्हणजेच भाड्याने देण्याच्या या प्रथे सोबतच महिलांचा व्यवसाय पशुसारखा करण्याच्या अघोरी वृत्तीचे,स्त्री दुखाचे विविध पदर या नाटकाच्या माध्यमातून गांभीर्याने मांडण्यात शिवम थिएटर्सची टीम यशस्वी ठरली.
मुलींची ही व्यथा जन्मदात्या मायबापांनाही कळू नये? जन्मदिलेल्या मुलीला विकायची प्रथा, ही कसली प्रथा? करा बलात्कार करा माझ्यावर ,जन्मदात्या बाईच्या उपकाराची परतफेड अशा कृतघ्नतेने करणाऱ्या या व्यवस्थेवर काजळी थुंकते ,तिचा विद्रोह, तिचे आक्रंदन, टाहो अस्वस्थता अधोरेखित करत मनाचा ठाव घेणारा आहे. किंबहुना बाई ही पायातली चप्पल आहे ती गुलाम आहे या तिच्याकडे पाहण्याच्या दुय्यम वृत्तीला ती नाकारते आणि काहीही झाले तरी मी गप्प बसणार नाही असे धाडसाने म्हणत धडीचा चा नारी बाजारच कायमचा बंद करण्याचा निर्धार काजळी करते.
चरस, गांजा विकणारे मांज्या चुक्का अन डोंगरू सुक्खा खेरोनादंग परिसरातील केसरीमल दरोगाच्या हाती लागतात. दरोगा दम दटावणी करून पोलीस मित्र बनण्याच्या अटीवर त्यांना सोडतो. या प्रसंगातील प्रसंगनिष्ठ विनोद प्रयोगाची रंगत वाढविणारा आहे. दरोगा केसरीमल कट रचून दोघांना नवीन कपडे देतो आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणतो. शिवपुरी स्टेशनवर सीआयडी इन्स्पेक्टर सारसकांत आणि दरोगा केसरीमल सापळा रचतात आणि त्यात अफगाणिस्तानला मुली पाठविणाऱ्या दलाल बेनिराम आणि चंचल ठाकूर यांना पकडण्यात यशस्वी होतात. ठाकूर यांनी आपल्या घरात लपवलेल्या २४ मुलींना सोडवलं जातं.
या मुली पुढील जीवनप्रवासासाठी उसासा टाकत मोकळ्या श्वासाने मार्गक्रमण करतात. काजळीचे बाप आणि भाऊ यांना प्रचंड पच्छाताप होतो ते माफी मागतात. काजळी चा गर्भ दिवसेंदिवस वाढत जातो शेवटी तिच्यासमोर जन्माला येणाऱ्या पोराला कोणाचे नाव देऊ! हा प्रश्न असतानाच मात्र सारस कांत हसतमुखाने तिचा बाळाचा स्वीकार करतो पण काजळी त्याला नकार देते. एक चांगला माणूस म्हणून तू मला स्वीकारशीलही पण माझ्या एकटी च्या सुटकेने बाकी मुलींचे प्रश्न सुटणार नाहीत.. त्या ही माझ्या सारख्या गर्भ धरून घरी आल्यात तर त्यांनी त्यांच्या पोराला बाप म्हणून कोणाचं नाव लिहावं? या प्रश्नावर सारस कांत निरुत्तर होतो.
नाटकातील संवाद ही परिणामकारक आहेत दरोगा च्या तोंडी ‘रहेगा गाव मे तो ,आयेगा एक ना एक दिन डाव मे’
कोरम्या : ‘ काजळे, तुझ्या लहानपणापासून तं आत्ता पर्यंत तुले खावा पेवाले, तुझ्या कपड्या लत्त्याले, जो खर्च केला आहे. तो खर्च वसुल कराची वेळ आली आहे…” यावरून मुलींकडे अर्थार्जनाचे साधन पाहण्याचा स्वार्थी दृष्टिकोन प्रत्ययास येतो.
सारस च्या तोंडी ‘किरदार कितना भी किमती क्यों न हो तुम्हारा पर रुतबा हम भी लाजवाब रखते है’
शाब्दिक व प्रसंगनिष्ठ विनोदाने नाटकात रंजन केले जाते. मंगेश जांभूळे आणि दिलीप लेनगुरे या विनोदवल्लीचा विलक्षण संवाद व अंगविक्षेपाने हास्योत्पादकता वाढते. नाही वे, बेलने,फलकवणे ,गवत अडवा पाडणे, झेडप्या, गोंदा,कपडे धुवायचा गोटा ,खेडमा, बुंडरेला, रांडा, साला अशा शाब्दिक खोट्या बरोबरच दोघातील क्रिया प्रतिक्रियातून संवाद फुलत जात विनोद निर्मिती होते.
नाटकातील गीत रचना ही कथानकाला पुढे नेणारी आशयवाहक आहे. सुक्का (लेंनगुरे )यांची अस्सल आदीमाची मराठी भाषा बोलण्याची हुबेहुब शैली, दरोगाने सुक्कास मारहाण,आदळआपटीचा जिवंत अभिनय वाखाणण्यासारखे .
‘तेरी कसम, प्यार की दुनिया मे है पहिला कदम’
‘बाताले समझे मायो लोगुर पकाय तरास हिंतोर’ तथा माडिया गीत निमे पिरूमते सपा चाटकीमा ओ नन्ना…’जवापासून पायलो तुले जीव झाला बावरा, करशील का तू मले सांग तुझा नवरा’, यांन मामाची पोरगी पटवलंन, ‘रुपान देखणी तू कोण्या शायर ची लेखणी तू’ अशा विनोदी गीताने हास्यतरंग फुलतात. तसेच ‘निमे पिरूमते.. संगोना..(माडिया बोलीतील)
‘डोळ्यातून आसवांची ची धार कशी पाजळी ..फिरुनी साथ मला दे जवळी पुन्हा मला घे ‘हे लयबद्ध संथलयीतील आशयवाहक गीत ,हळूहळू कुस्करा इश्काचा हा मोगरा ”राया सोडा ना सोडा ‘ही लावणी तसेच शीर्षक गीत मानवी मनाला जडला आजार मांडला बाजार विठ्ठला.. बाजारी विकली गा नार विठ्ठला ‘ जन्म गेला वाया देवा नासली ही काया.. बोली लावतो देहाची बाप भाऊराया..पांडुरंगा कुठ आटली रं माया ‘ दीनदु:खीतांचा कळवळा असणाऱ्या पांडुरंगाशी संवादी आर्त शोककारी गीत समर्पक नाट्याशय अभिव्यक्त करणारं असून ऐकताक्षणी अंत:करण हळहळायला लागते. प्रामुख्याने नाटककार हे स्वतः गीतकार व गायक असल्यामुळे त्यांनी सर्व जागा बरोबर हेरून केलेली गीतांची रचना व दिलेले संगीत वाखाणण्यासारखे आहे. या नाटकातील प्रत्येक गाणं हे युवराज गोंगले यांनी स्वतः लिहिलेलं आणि सांगितबद्ध केलेलं आहे हे विशेष.
उच्चशिक्षित समाजाप्रती बांधिलकी असणारा, अन्याय- अत्याचाराच्या विरोधात आवाज बुलंद करणारा, धाडसी सारसकांत – (युवराज गोंगले ),
सारसकांतवर प्रेम करणारी रुपवती, धडीच्या कुप्रथेला विरोध करणारी , सामाजिक व्यवस्थे विरोधात आवाज बुलंद करत विद्रोह पुकारणारी अग्रगामिनी रणरागिणी काजळी ( ममता गोंगले), गुन्हेगारावर वचक ठेवणारा, प्रसंगी त्यांना आपल्या कटात सामील करून कारस्थान उघडकीस आणणारा जखमी दरोगा केसरीमल ( चारुदत्त झाडे ), काजळीच्या नेहमी सोबत राहणारी , अन्यायाविरोधात बोलणारी मिश्किल शैलीची पारिजा -(ऋतू ),
पैशाच्या हव्यासापोटी जन्मदात्या मुलीला बाजारात विक्रीकरिता जबरदस्ती करणारा हैवान बाप रामसू हलमे (डी. एन. राजा ), सख्ख्या बहिणीच्या विक्रीचा लिलाव मांडणारा दुष्ट लालची भाऊ कोरम्या हलमे (प्रणय देवगडे ), गांजा चरस चा व्यवसाय करणारा व प्रत्येक संवादाने प्रेक्षकांना हसविणारा विनोद वीर मांज्या चुक्का (मंगेश जांभुळे ), दारूचा व्यवसाय करणारा आणि विविध शाब्दिक कोट्या व वैशिष्ट्यपूर्ण बोलीद्वारे प्रेक्षकांना हसवणारा विनोदवीर डोंगरु सुक्खा (दिलीप लेनगुरे ), नारी बाजारात सक्रिय असलेला धूर्त कावेबाज दलाल चंचल ठाकूर – (प्रशांत खडसे ), धडी बाजारातून स्त्रियांना भाड्याने घेऊन त्यांचे शोषण करणारा अत्याचारी बेनिराम ठाकूर – (दिलखुश कूनघाडकर) ,रखवालदार – (विजय वाटकर) , डफरीवाला – (संदिप टेकाम ), डाउरी ( मेघना) , मुस्की ( पल्लवी) आधी पात्रांच्या संवादातून अभिनव नाट्यशय व्यक्त होतो
नाटककार युवराज गोंगले यांनी आदिम जमातीचे गैर आदिवासींकडून होणारे शोषण नाटकांतून दर्शविले आहे.किंबहुना अंधश्रद्धा, फसवणूक, जबरदस्तीचे क्रूर वास्तवा बरोबरच गंभीर विषय विविध प्रसंगाद्वारे नेमकेपणाने मांडला आहे .नाट्य आशयाशी निगडित पात्र व त्यांची आदीम जमातीतील नावे, नेमके प्रसंग रेखाटन, प्रसंगनिष्ठ विनोद व गंभीर शैलीमुळे नाटक शेवटपर्यंत प्रेक्षकांना पहावेसे वाटते.दरवर्षी धडीचा चा बाजार भरवला जातो दरवर्षी अनेक नवोदित मुलींना विक्री करिता उभ्या केले जाते दरवर्षी नवीन नवरा त्यांना मिळतो निश्चितपणे सर्व दुःख निमुटपणे त्यांना सहन करावं लागतं ,या दुःखाना मर्म स्पर्शी पणे नाटकातून उजागर केले आहे .अशा अनिष्ट, रूढी परंपरा कायद्याने केव्हाच बंद केलेल्या आहेत. परंतु कायद्याची पायमल्ली करणाऱ्या नीच माणसामुळे अशा अघोरी प्रथा अजूनही सुरू आहेत ,हे दुःख नाटकातून मांडले आहे.खरे तर विलक्षण विषय झाडीपट्टीत पारंपारिक ढाच्याला आकर्षित होणाऱ्या प्रेक्षकांसमोर मांडणे तसे जिकिरीचे कार्य परंतु नाट्याशय समर्थपणे दर्शविण्यात युवराज गोंगले यशस्वी ठरले आहेत. खलनायकाचा कुठेही अवास्तवपणा आढळत नाही, आक्रस्ताळेपणा नाही, आदिमता दर्शविणारे नेपत्य व वेशभूषा,अत्यंत संयतपणे संहितानुरूप प्रसंग आणि पात्र रचनेचे उत्कृष्ट नाटक आहे.मी पाहिलेल्या यावर्षीच्या नाटकातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून या नाटकाचा उल्लेख करता येईल.निश्चितच झाडीपट्टी रंगभूमीला वेगळे परिमाण देणारे , झाडीपट्टी रंगभूमीचे अनुभवक्षेत्र विस्तारत कक्षा रुंदावत वेगळे परिमाण देणारे ‘बाजारी विकलेली नार ‘हे नाटक आहे.
प्रा.राजकुमार मुसणे , गडचिरोली