By : Shankar Tadas
कोरपना: वेगाने वाहन चालवू नका, मृत्यूस आमंत्रण देऊ नका असा संदेश चंद्रपूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अभिजीत जिचकार यांनी विद्यार्थ्यांना दिला. जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कॅम्प खिर्डीच्या वतीने गुरुवारी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे प्रकल्प अधिकारी कमल कुमार यांच्या हस्ते पार पडले. तर प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, महेंद्रप्रताप पाठक, प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पुनमकुमार अर्जापुरे, रासेयोचे समन्वयक प्रदीप परसुटकर, पर्यावरण सेवा योजनेचे समन्वयक सचिन भैसारे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व, वाहतुकीचे नियम, हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने शिस्तबद्ध वाहतुकीचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान पोस्टरद्वारे वाहतुकीचे नियम समजावून देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा शपथ दिली गेली. यावेळी घोषवाक्य स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून, त्यांनी अशा कार्यक्रमांची अधिक आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले. तत्पूर्वी शहरभर वाहतूक जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सावित्रीबाई फुले विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर, श्री. शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, नांदाफाटा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.