लोकदर्शन जिवती 👉प्रा. गजानन राऊत
विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, जीवती येथे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभिनव उपक्रमा अंतर्गत दि. 9 रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री एस. के. वसाके यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पवन चटारे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला होता. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री एम. एस. साबळे यांनी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाविषयी आणि ग्रंथालयातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. या ग्रंथप्रदर्शनात मराठी वाचन साहित्यातील निवडक कथा, कादंबरी, आत्मचरित्रे, नाटक आणि कविता यांचा समावेश करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शक्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचनासाठी आठवड्यातून किमान एक तरी ग्रंथ घेऊन जावे व त्याचे वाचन करावे असे आवाहन केले. सदरील ग्रंथ प्रदर्शन उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय परिचारिका श्रीमती सगुणा डि. बिरादार यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी संयुक्तरित्या परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.