By : Shankar Tadas
कोरपना : तालुक्यातील चंद्रपूर ते कोडशी बूज बस फेरी आता गांधीनगर मार्गे धावणार आहे. त्यामुळे गांधीनगर व तुळशी गावातील ग्रामस्थांना या बस मधून प्रवास करणे सोयीचे होणार आहे. पैनगंगा नदी व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे गाव असलेल्या कोडशी बूज साठी अनेक वर्षापासून बस सेवा आहे. मात्र ही बस तांबाडी गावावरून गांधीनगर न जाता दुसऱ्या मार्गाने थेट कोडशी बूज ला जात होती. त्यामुळे गांधीनगर व तुळशी येथील ग्रामस्थांना कोडशी बूज किंवा तांबाडी येथे जाऊन ही बस पकडावी लागत होती. यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय व्हायची. ही बस फेरी गांधीनगर मार्गे सुरू करण्यात यावी अशी अनेक वर्षापासून ची मागणी होती. ती राज्य परिवहन महामंडळाने मान्य करून ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे. ही बस फेरी कोडशी बूज नियमित सकाळी साडे आठ वाजताची आहे. तसेच या बस मुळे गांधीनगर येथून यवतमाळ जिल्ह्यातील तेजापुर गावाला जाणाऱ्या ग्रामस्थांना ही सोयीचे झाले आहे.
स्वातंत्र्याच्या ७७ तर गावनिर्मितीच्या ६३ वर्षानंतर गावात बस
तालुक्यातील कोडशी बूज हे गाव पैनगंगा नदीच्या तीरावर असल्याने येथे पावसाळ्यात नदी पूरस्थितीत अनेकदा पूर येतो. त्यामुळे १९६२ साली कोडशी बूज व परिसरातील काही ग्रामस्थांनी गांधीनगर गाव वसवले. याला ६३ वर्ष पूर्ण झाली. गावांनी बरीच प्रगती सुद्धा या कार्यकाळात गाठली. परंतु या गावात आजगायत एकही बस येत नव्हती. आता ही बस सुरू झाल्याने गावांनी आनंद उत्सव साजरा केला. तसेच बसचे स्वागत करून राज्य परिवहन महामंडळाचे आभार सुद्धा मानले. ही बस सेवा सुरू करण्यासाठी कोडशी बूज चे सरपंच उमेश कोल्हे व प्राध्यापक बंडू मालेकर यांनी आगार व्यवस्थापक कडे विनंती करून अनेकदा पाठपुरावा केला होता.