लोकदर्शनं पुणे 👉 राहुल खरात
पुणे 29 डिसेंबर देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत पुणे येथे प्रथमच २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान सलग चार दिवसीय आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे आयोजन एस एम जोशी फाऊंडेशन सभागृह नवी पेठ पुणे येथे केले असून या दरम्यान प्रबोधनपर विविध कार्यक्रमांची रेलचेल असून यासाठी सुमारे सहाशे हून अधिक कवी सहभागी होणार असल्याची माहिती मुख्य आयोजक प्रसिद्ध साहित्यिक भिडेवाडाकार कवी, शिक्षक विजय वडवेराव यांनी दिली.
पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज़ोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई या दांपत्याने देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. या इतिहासाचे जतन व्हावे, पुढच्या पिढीला समजावे, याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने “भिडे वाड्यातील पहिली मुलींची शाळा” या विषयावर सुमारे सहासे कवींचा सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे आयोजन केले आहे. या महोत्सवात चार दिवस दोन वेळा चहा नाश्ता व दुपारचे स्वादिष्ट जेवण मोफत दिले जाणार आहे. तसेच या महोत्सवात सहभागी फुले प्रेमी कवी व पुरुष प्रेक्षक पांढरा सदरा व पांढरा पायजमा घालून तर फुले प्रेमी कवयित्री व महिला प्रेक्षक सावित्रीबाईंच्या वेशभूषेत हिरवी साडी नेसून सहभागी होणार असल्याचे तसेच सहभागी कवी व कवयित्रींना आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही भिडेवाडाकार कवी श्री विजय वडवेराव यांनी यावेळी सांगितले.
फुले फेस्टिवल २०२५ साजरा होत असताना दि २ ते ५ जानेवारी दरम्यान चारही दिवस प्रत्येक दिवशी दहा -अकरा कवी कवयित्रींचे दहा ते अकरा गट तयार केले असून प्रत्येक सहभागी व्यक्तीस वैयक्तिक याची माहिती देण्यात आली आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी कुणाकडून ही प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून मुख्य आयोजक भिडेवाडाकार विजय वडवेराव हे स्वतः सर्व खर्च करत असल्याचे सांगितले. फुले फेस्टिवल मध्ये चार दिवस “भिडे वाड्यातील पहिली मुलींची शाळा” या विषयावर काव्य जागर होत असतानाच गझल मुसायरा, परिसंवाद, नाट्यछटा, पोवाडा, मी सावित्री बोलतेय, मी जोतीराव बोलतोय,मी भिडेवाडा बोलतोय, या विषयावर एकपात्री, लाठीकाठी -दांडपट्टा प्रात्यक्षिके असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसेच सहभागी सहाशे कवी व कवयित्रींना “भारतीय संविधान” भेट देण्यात येणार आहे तसेच देश-विदेशातील सुमारे २५ व्यक्तींना आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहितीही भिडेवाडाकार विजय वडवेराव यांनी दिली.
पुण्यात पहिल्यांदाच होत असलेल्या फुले फेस्टिवल मध्ये सुमारे सहाशे फुले प्रेमी कवी-कवयित्री व सहभागी फुले प्रेमी रसिक प्रेक्षक महिला क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या वेशभूषेत तर पुरुष पाढऱ्या शुभ्र सदरा पायजमा घालून आपली काव्य कलाकृती सादर करताना पाहणं नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण असेल. किंबहुना हेच या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. त्या मुळे देशातील विविध राज्यांतील व विदेशातील फुले प्रेमींनी बहुसंख्येने चारही दिवस फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन महोत्सव यशस्वी करावा तसेच महात्मा ज़ोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांचे उत्तुंग कार्य सर्वदूर पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य आयोजक, फुले प्रेमी कवी, भिडेवाडाकार विजय वडवेराव यांनी केले आहे.
पुण्यात पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात सुरु झाली होती. आपण स्वतः पहिले कवी संमेलन भिडे वाड्यातच घेतले होते. आज पूर्वीचा भिडे वाडा राहिला नाही. परंतु त्याचा इतिहास जपला जावा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही माहिती दिली जावी यासाठी येथे सादर होणाऱ्या सहाशे कवितांचा संग्रह प्रकाशित केला जाणार आहे. पुण्यात फुले जिंकले पाहिजेत यासाठीच हा खटाटोप केला असल्याचेही शेवटी कवी विजय वडवेराव यांनी सांगितले.