By : प्रा. डॉ.राजकुमार मुसणे, गडचिरोली
माय बापाने प्रचंड परिश्रमाने मुलांना शिकवावे, त्यांचे भवितव्य उज्वल घडविण्यासाठी खस्ता खाव्यात.प्रसंगी घरातली पारंपारिक उपजीविकेचे साधन असलेलीजीवापाड जपलेली शेतीही विकावी, कसण्याचा बैल विकावा किंबहुना सौभाग्य अलंकार मंगळसूत्रही मुलांच्या शिक्षणासाठी विकावे आणि मुलांनी मात्र पंख फुटताच वडिलांनी केलेल्या कर्तव्याची जाणीव न ठेवता त्यांना लाथाडावे, हाच विषय देवेंद्र लुटे लिखित, देवेंद्र दोडके दिग्दर्शित, गायत्री रंगभूमी निर्मित’ विसरू नको मायबापाला’ या नाटकातून दर्शविण्यात आलेला आहे. नुकताच 30 नोव्हेंबरला तेलंगणा राज्यातील जक्कापूर , (शिरपूर)येथे’ विसरू नको माय बापाला’ नाट्यप्रयोग परिसरात वाघाची प्रचंड धुमाकूळ असतानाही शिवाय वाघाने केलेल्या हल्ल्यामुळे एक मृत्यु व दोन जखमी असतानाही सीमावर्ती भागातील गावात यशस्वीरित्या संपन्न झाला. झाडीपट्टी रंगभूमीने राज्याच्या सीमा पार करत झेंडा रोवल्याचे हे धोतकच.
समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे शिक्षणाचे लोन ग्रामीण भागातही पसरल्याने संस्कारित झालेल्या पिढीने आपल्या मुलांच्या शिक्षणाकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा विडा उचललेला. रामचंद्र- गिरीजा हे दाम्पत्य गोविंद आणि रंजीत या मुलासह सुखाने नांदणारे. गोविंद घरची शेती सांभाळणारा तर रंजीत उच्च शिक्षणासाठी शहरात गेलेला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे म्हणून घरी वारंवार मागणी करणारा रंजीत आई-वडिलांची दिशाभूल करतो. शहरात शिक्षणापेक्षाही गैर गैरुकृत्यात अडकला जातो. पोटाला चिमटा देत आई वडील ,भाऊ- वहिनी रंजीतला वेळोवेळी पैसे पुरवितात. त्या पैशाच्या भरोशावर शहरात रणजीत ऐश करतो. गोवर्धन बारचे मालक किराणा मर्चंट गोवर्धन यांच्या मुलीवर शिक्षण बाजूला सारत प्रेमांभिलाषा करीत वाहवत जातो. भाबड्या आई-वडिलांना शिक्षणाच्या बहाण्याने वारंवार पैसे मागतो. मुलगा उच्चशिक्षित झाला पाहिजे नोकरीवर लागला पाहिजे या आशेने शिक्षणाचे महत्त्व जाणणारे संस्कारी वडील रामचंद्र बैल विकून पैसे पाठवतात. आई मंगळसूत्र विकून मुलांच्या शिक्षणाची तजवीज करण्यासाठी धडपडते. नापिकी, दुष्काळ आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे कुटुंब डबघाईस यायला लागते. भाऊ शिकला पाहिजे या आशेने गोविंदा- वत्सला मदतीसाठी सरसावतात. शिक्षणाचा ध्यास असल्यामुळे एक दिवस कुटुंब सुखी संपन्न होईल या आधी यांच्या किनारा गाठण्याच्या स्वप्नात मार्गक्रमण करणारे भाबडी आशावादी माणसं. शिक्षणाशिवाय गरिबी दूर होत नाही पिढीचा उद्धार होत राहील दर्जा तू रंजीतच आपल्याला मोकळा करेल हा विश्वास रामचंद्रच्या मनोमन आहे. परंतु घडते ते विपरीतच.
कष्ट आणि मेहनती शिवाय कोणताच माणूस प्रगती पदावर जाऊ शकत नाही. महात्मा फुले यांनी सुख संपत्तीला झुगारून शिक्षण प्रसार व समाजसेवेसाठी अहोरात्र धडपडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बॅरिस्टरची पदवी घेत संविधानाचे निर्माते झाले तर लालबहादूर शास्त्री हे गरिबीत जन्माला येऊनही देशाचे पंतप्रधान झाले. हे आपल्या मुलांना निक्षून सांगणारा संस्कारी बाप रामचंद्र मुलाच्या शिक्षणासाठी मंगळसूत्राचा त्याग करणारी गिरिजा, भाऊ शिकावा म्हणून काबाडकष्ट करणारा गोविंदा, दिराच्या शिक्षणासाठी धडपडणारी वत्सला ,श्रीमंताच्या मुलीशी विवाह करून गर्भ श्रीमंत बनलेला रंजिंत आपल्या आई-वडिलांना साधी ओळखही दाखवत नाही, त्यांना साफसफाई करायला लावतो, नोकर म्हणून काम करण्यास भाग पाडतो,त्यांची वारंवार अवहेलना करतो ,धिक्कारतो, किंबहुना त्यांना विष युक्त खीर खावयास प्रवृत्त करतो. मुलांनी पाठवलेली खीर म्हणून प्रेमाने खाल्ल्याने त्यात आईचा मृत्यू होतो. जिवंतपणे आई-वडिलांचे निर्भत्सना करणाऱ्या मुलाला आईच्या प्रेताला रंजीतला स्पर्शही करू दिल्या जात नाही, हा प्रसंग भावनोत्कट आहे.
मुलांनी शिकले पाहिजे यासाठी धडपडणारा संस्कारी बाप रामचंद्र अर्थात माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील सुभेदार, तानी चित्रपटातील सिनेअभिनेते (देवेंद्र दोडके),मुलाच्या शिक्षणासाठी आपल्या गळ्यातील सौभाग्य अलंकार मंगळसूत्र क्षणाचा विलंब न लावता काढून देणारी वात्सल्यमूर्ती वत्सला ( रूपाली ठाकरे) ,लहान भाऊ शिकला पाहिजे यासाठी धडपडणारा, अपेक्षाभंग होताच व्यसनाच्या अधिन जाणारा, मात्र आई-वडिलांस दैवतसम मानणारा गोविंदा (प्रा.संतोष बारसागडे) ,कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत होण्याकरिता धडपडणारी दिराच्या शिक्षणाची तळमळ असणारी प्रेमळ संस्कारी सून (रजनी नागपूरकर), शिक्षणाच्या नावाखाली ऐश करणारा, प्रेमाची प्रतारणा करणारा, फसगत करणारा , श्रीमंतांच्या संपत्तीवर डोळा असणारा धुर्त, कावेबाज,चतुर मायबापाची ओळख विसरणार कृतघ्न रंजित (किशोर बावणे),रंजितवर प्रेम करणारी , स्नेहाचा झरा दरवळत माणुसकी धर्म निभावणारी चनोली (विद्या ठाकरे), गोवर्धन बारचा मालक ,किराणा मर्चंड, धनाढय व्यापारी गोवर्धन (फईज शेख), गोवर्धन चा नोकर नाम्या (लुंकेश फुलबांधे), संपत्तीवर डोळा असणारा कंजूष जानराव (मयूर चन्ने), लग्नासाठी हपापलेला दाम्या (सिद्धार्थ कोवले), नृत्यांगना रंगी (अरुणा ठवरे) या पात्रांच्या समन्वयातून कौटुंबिक नाट्य साकार होते.
कर्तव्यास विसरलेल्या कृतघ्न मुलाची कहाणी म्हणजे हे नाटक आहे . मायेच्या भुकेने कासावीस झालेल्या आई-वडिलांची व्यथा म्हणजे हे नाटक आहे. आपुलकी , जिव्हाळ्याचे कौटुंबिक स्नेह स्वार्थामुळे कसे दुभंगत जातात, याचे चित्रण नाटकातून करण्यात आले आहे.
शिक्षण घेऊन मुलांच्या संवेदनाच मरत असतील तर मुलांना शिकवायचे कशाला? हा प्रश्न निर्माण करणारे हे नाटक आहे .आईच्या दुधाचे मोल कळत नसेल तर शिक्षण शिकवायचे कशाला ?हा अंतर्मुख विचार देणारं हे नाटक आहे. आपलं रक्त बेइमान निघाल्याचे बोचणाऱ्या शल्याचें हे नाटक आहे. जन्मदात्या लेकरांनीच ओळख विसरल्यानंतर मायबापाने कुणापुढे पदर पसरायचा ?याचा शोध म्हणजे हे नाटक आहे. दैवतांनाही लाथाडणाऱ्या बेईमान रक्ताची कहाणी,स्वतःतच मश्गुल असणाऱ्या पिढीची व्यथा , केवळ अधिकाराची जाणीव ठेवत कर्तव्य पूर्णत:विसरणाऱ्या ,माणुसकी धर्म सोडणाऱ्या अभागित्वाचे हे नाटक आहे.आपल्या जन्मदात्या दैवताविषयी बेईमान होणाऱ्या मुलांची व्यथा, रक्ताचे पाणी करून शिकवणाऱ्या मायबापांचा टाहो काळजाला भिडणारा व अंतर्मुख करणारही ठरला.आधुनिक काळात कौटुंबिक नातेसंबंधात होणारे बदल आणि नवीन पिढीतील स्वकेंद्रितता याचे प्रत्यंतर नाटकांतून घडते.
‘खांद्यावरती नांगर घेऊन काया झिजवली ,’आई तुझ्या काळजाचा ग आहे मी तुकडा ,’मातापित्याची सेवा कर विसरू नको रे कधी ‘, भिरभिरणारा फुलपाखरू फांदीवरती बसला रूप तुझे पाहून गाली चंद्र हसला’, या स्वरबहार विशाल बावणे यांच्या मधुर गायनाने नाट्याशय अधिक गडद होत रंगत आली.
‘झुळूक वाऱ्याची ‘यमन कल्याण रागातील स्वरसम्राट विशाल बावणे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
तर प्रा. संतोष बारसागडे यांच्या ‘सोडून गेली माय माऊली कुणी नाही गाठी ,भीक आम्हाला द्या हो अंत्यसंस्कार करण्यासाठी’ या शोककारी गीताने अंतकरण हेलावत प्रेक्षकांचेही डोळे पाणावले. एकंदरीत सिने अभिनेते देवेंद्र दोडके यांचा भारदस्त अभिनय, रजनी नागपूरकर यांचा आंगिक, कायिक ,वाचिक प्रभावी अभिनय व प्रा. संतोष बारसागडे यांच्या वाचिक अभिनयाच्या उंचीने नाटक श्रेष्ठ ठरले.
आर्गन मंगेश पेंदोर, तबला आकाश मडावी यांच्या
तालबद्ध वादनाने रंगत आणली . मयूर चने, सिद्धार्थ कोवले व लुकेश फुलबांधे या त्रिकुटाच्या विनोदामुळे नाट्यरसिक खुर्चीला खिळत राहिले. ९७०लिटर दूध देणारी म्हैस , ९७० पोते धान पिकणारी शेती या मयूर चेन्ने यांच्या हास्योत्पादकता विनोदाने रंगत आली.
विषारी खीर खाल्याने मृत्यू पावलेली आहे व
खांद्यावर जू घेत नांगराला जुंपलेला बाप, गोविंद आणि वत्सलातील काठीने हाणामारी, पुत्रमोहाने पत्ता शोधत भटकणारे मायबाप, आपल्याच मुलाच्या लग्नात पत्रावळीतील उष्टे अन्न जमा करणारे मायबाप, स्वतःच्या मुलांने केलेला पाणउतारा जिव्हारी लागल्याने हतबल मायबाप, पैशाच्या धुंदीने नाती विसरणारा कृतघ्न रंजित, त्याची रासलीला,आईच्या अंत्ययात्रेसाठी भीक मागण्याचा प्रसंग असे नाटकातील कितीतरी प्रसंग भावनिक, हृदयस्पर्शी शोक रसातील मनाला चटका लावणारे आहेत. या सहानुभवासाठी नाटक आवर्जून पाहायलाच हवे.