,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
प्रतीतिरूपती म्हणून ख्याती असलेल्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांचा कार्तिक उत्सव प्रसन्न व मंगलमय वातावरणात सुरू झाला आहे. दि. ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी कार्तिक शु. १० ला मंडपोत्सव संपन्न झाला. या प्रसंगी सर्व समाजाचे मानकरी, सेवेकरी, ब्राम्हणवृंद, पुजारी वृंद, श्री बालाजी संस्थानचे व्यवस्थापक, कर्मचारी व प्रसिद्धी प्रमुख श्री. सूरज गुप्ता यांची उपस्थीती होती. सर्वांच्या सहकार्याने व दोरांच्या सहाय्याने श्रींच्या मंदिरापासून गणपती मंदिरापर्यंत १६ कापडी मंडप उभारण्यात आले. रीतीरिवाजाप्रमाणे खोबर्याचे वाटप करून मंडपोत्सव संपन्न झाला.
याप्रमाणे दि.११ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत श्रींचा कार्तिक उत्सव संपन्न होईल. दि.१४ नोव्हेंबर, २०२४ रोजी दीपोत्सवास सुरूवात झाली आहे. श्री बालाजी महाराजांचा गाभारा विशेष मखराने सजवण्यात आला आहे. या उत्सवादरम्यान श्री बालाजी संस्थानच्या वतीने श्री बालाजी महाराजांच्या मंदिरासमोर स्टीलच्या कठड्यांवर दिव्यांची आरास ठेवून रोषणाई केली जाते. श्रींच्या दर्शनासाठी येणारे भक्त विशेषत: महिला दिव्यांमध्ये तेल घालून दिवे प्रज्वलीत ठेवतात, त्यामुळे श्रींच्या मंदिरासमोरील वातावरण तेजोमय राहते. हा दीपोत्सव कार्तिक लळीतापर्यंत साजरा करण्यात येतो.
महाद्वाराजवळील मारोतीच्या बैठकीवर दि.१५ नोव्हेंबर, २०२४ रोजी रात्री गोंधळाचा कार्यक्रम सुरू होईल, जो कार्तिक लळीतापर्यंत दररोज असेल. याप्रसंगी श्री बालाजी व इतर देवी देवतांची भावगीते सादर केली जातात.
दि. १९ नोव्हेंबर, २०२४ रोजी अनुष्ठान समाप्ती होईल. २१ ब्रह्मवृंदांकडून घटस्थापनेपासून सुरू असलेल्या यात्रेच्या अनुष्ठानाची सांगता होईल. कार्तिक उत्सवाचा समारोप दि. २५ नोव्हेंबर, २०२४ रोजी लळित उत्सवाने होणार असून याप्रसंगी काल्याचे कीर्तन होईल. अशा प्रकारे श्री बालाजी महाराजांचा कार्तिक उत्सव संपन्न होणार आहे, अशी माहिती श्री बालाजी संस्थान तर्फे देण्यात आली. हा उत्सव आनंदमय वातावरणात संपन्न व्हावा यासाठी संस्थानचे व्यवस्थापक श्री. किशोर बीडकर, श्री. आशिष वैद्य व कर्मचार्यांनी योग्य ते नियोजन केलेले आहे. भाविकांनी कार्तिक उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बालाजी संस्थानचे वंश पारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी केले आहे.
—————————–