By : Shankar Tadas
कोरपना : आई -वडिलानंतर आदराचे स्थान शिक्षकाला असते. मात्र एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. सदर मुलगी अतिशय गरीब कुटुंबातील असूनही अत्याचाराविरुद्ध त्यांनी जी हिम्मत दाखविली त्याला दाद दिली पाहिजे. खूप लोकांनी दबाव टाकला तरीही मुलीच्या आईने न घाबरता पुढे होऊन आरोपीवर गुन्हा दाखल करवून घेतला. आरोपीने इतरही मुलीचे लैंगिक शोषण केल्याची माहिती आहे. ती लवकरच पुढे येईल. महिलांनी न घाबरता पुढे यावे. सरकार आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन भाजपा नेत्या चित्राताई वाघ यांनी केले. कोरपना येथील अत्याचार पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्या आल्या असता सदर घटनेबद्दल पत्रकारांशी त्यांनी बातचीत केली.
कोरपना अत्याचार प्रकरणावर एकही शब्द न बोलणाऱ्या विरोधी पक्षातील महिला नेत्यांवर चित्राताई यांनी टीका केली. बारामती, सोलापूर, अमरावती, मुंबईच्या काँग्रेसच्या ताई याप्रकरणी बोलल्या नाहीत, याचे आश्चर्य वाटते, असे त्या म्हणाल्या. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे केवळ राजकारण करणारी ही मंडळी आहे आणि आता त्यांचा खरा चेहरा समोर आलाय, असे वाघ म्हणाल्या. यावेळी राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत मोहब्बत की दुकानात काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित केला.
आरोपी अमोल लोडे हा काँग्रेसचा पदाधिकारी होता. त्याचे नियुक्तीपत्र खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार तथा काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुभाष धोटे यांनी दिले होते. खा. धानोरकर या एक महिला आहेत. मात्र या घटनेवर त्यांनी एक चक्कार शब्द बोललेला नाही, याचं मला आश्चर्य वाटते. हे तेच धोटे आहेत ज्यांच्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला होता.
कोरपना येथील अमोल लोडे या शिक्षकाकडून शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी पीडितेच्या कुटुंबीयाची भेट घेतली व घडलेला प्रकार सविस्तर जाणून घेतला. या प्रकरणात सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगून भावनिक धीरसुद्धा दिला.
याप्रसंगी त्यांच्या समवेत राजुरा विधान सभा क्षेत्र निवडणूकप्रमुख देवराव भोंगळे, माजी आमदार एड. संजय धोटे, महिला भाजपाच्या अल्का आत्राम उपस्थित होत्या.