By : Rajendra Mardane
वरोरा : मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त, अतिक्रमण धारक, पुनर्वसित गावातील गोरगरीब नागरिक न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. मात्र शासन व प्रशासनाकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांची ससेहोलपट होत आहे. आज वरोऱ्यात विविध मागण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष शेख जैरुद्दीन ( छोटुभाई ) याच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चा पुकारण्यात आला होता. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डी.जेनित चंद्रा (भा. प्र.से.) यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकरी, पुनर्वसित गावातील नागरिक, प्रकल्पग्रस्त, अतिक्रमण धारक, दारुबंदी साठी सरसावलेल्या महिला, दिव्यांग समस्याग्रस्त नागरिक यांच्या विविध मागण्यासाठी छोटुभाई शेख यांनी मोर्चा काढला.आज सकाळी ११ .०० वाजता भव्य मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकावरुन निघाला. मोर्चात ट्रॅक्टर, बैलबंडीसह शेतकऱ्यांचा सहभाग अनोखा ठरला. मोर्च्यात शेतकरी वर्ग, महिला, लहान मुलांसह हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मागण्यांचे फलक घेऊन हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. पळसगाव, रानतळोधी पुनर्वसित गावातील नागरिक, आशी गावच्या महिला, टेमुरडा गावातील अतिक्रमण धारक नागरिकांचे प्रतिनिधी, रुहिना शेख, छोटुभाई आदिंनी आपले मनोगत व्यक्त करीत समस्या निराकरणाची आग्रही मागणी केली. छोटुभाई शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. पळसगाव पुनर्वसन गावातील नागरिकांच्या मागण्या त्वरित मान्य करून, त्यांना सर्व आवश्यक सुविधा पुरवाव्यात याव्यात. रान तळोधी पुनर्वसन गावातील नागरिकांच्या विविध मागण्या मान्य करून, त्यांना न्याय मिळवून द्यावा. डोंगरगाव, गौड व नागरीसह तालुक्यातील विविध ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी. वाढत असलेल्या विद्युत युनिट दर व टॅक्सेशन दरात तातडीने कपात करण्यात यावी. आदिवासी शेतकऱ्यांचे प्रलंबित वन हक्क प्रकरणे त्वरित मंजूर करून, त्यांना पट्टे देण्यात यावेत. आशी गावांत सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. महसूल व नगरपरिषद जागेवरील अतिक्रमणधारकांना जागेची नियमितता व पट्टे देण्यात यावेत. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या हानीसाठी नागरिकांना नुकसानभरपाई देण्यात यावी व ब्लास्टिंगचा प्रमाण कमी करण्यात यावा. शेतकऱ्यांचे प्रलंबित कृषी पंप विद्युत कनेक्शनचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. संजय गांधी व श्रावण बाळ योजनांतील लाभार्थ्यांचे वेतन वाढवून १५०० रुपये करण्यात यावे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात तातडीने वाढ करण्यात यावी. घरेलू कामगार महिलांना वार्षिक १०,००० रुपये अनुदान व आवश्यक साहित्य देण्यात यावे. अपंग व्यक्तींना नगरपरिषद व शासनाकडून मिळणाऱ्या निराधार आर्थिक अनुदानात वाढ करण्यात यावी. स्थानिक कोळसा खान व इतर प्रोजेक्ट कंपन्यांमध्ये ८०% रोजगार प्रकल्पग्रस्त व स्थानिक लोकांना देण्यात यावे. ग्रामीण व शहरी भागातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावे. वरील सर्व समस्येचे निवारण होण्याकरिता सर्व अधिकाऱ्यांची सामूहिक बैठक घेण्यात यावी. साई वर्धा पावर, जीएमआर पावर कंपनी, एकोणा कोळसा खदान येथील चिमणी मधील दूषित धूर बंद करणे व नदी व नाल्यात सोडण्यात आलेले दूषित पाणी बंद करून सीएस आर ऍक्टिव्हिटी अंतर्गत वरोरा शहर व तालुक्यात सार्वजनिक करण्यात यावा. सतत सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असू सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्यांचे निवेदन दिले. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डी.जतिन चंद्रा यांनी आंदोलकाचे म्हणणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
मागण्यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देत १५ दिवसांत जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा छोटुभाई शेख यांनी दिला आहे. शिष्टमंडळात व मोर्च्यात वसंतराव विधाते, कैलास कुमरे,रुहिना शेख, शेषराव भोयर, सरपंच रघुनाथ दडमल, जयमाला भोयर,जावेद अंसारी, फारूक शाह, मोहसीन पठाण, शब्बीर शेख, माजी सरपंच पूर्णिमा गाऊत्रे, महेश धुर्वे, प्रफुल्ल शेडमाके, विलास आत्राम, अक्षय मडावी, कैलास राम, मंगलदास आत्राम,आनंदराव चिडाम, शुभांगी कुमरे आदींचा समावेश होता. तत्पूर्वी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा संपन्न झाला.यावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.