By : Shankar Tadas
कोरपना : तालुक्यातील शेतकरी संघटनेचा प्रभाव कायम राखून असलेल्या ISO कढोली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे सदस्य अपात्र कसे करता येईल, यासाठी झटत असून त्यांच्या प्रयत्नाला बरेच यशही आले आहे. नुकतेच येथील सरपंच आणि एक सदस्य यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्याने येत्या सोमवारी, 26 ऑगस्ट रोजी नवीन सरपंच निवड करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सदस्यत्व रद्दच्या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागण्यात आली होती. त्यानुसार 26 ऑगस्ट रोजीच त्यांनी या प्रकरणाच्या सुनावणीकरिता संबंधित अधिकारी आणि सदस्य यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यांच्या निर्देशांचा कोणताही लाभ सत्ताधारी गटाला होताना दिसत नाही. त्यामुळे कढोली खुर्द येथे आदिवासी राखीव जागेवर काँगेसचे बोरी नवेगाव येथील सदस्य उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड निश्चित मानली जात आहे.
सदस्य अपात्रतेची एकूण पाच प्रकरणे या ग्रामपंचायतीमध्ये आहेत. त्यापैकी एक सदस्य यापूर्वी रद्द झाल्यावर निवडणूक झाली. त्यानंतर आणखी चार सदस्यांविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. त्यापैकी आता सरपंच निर्मला मरस्कोल्हे आणि पंधरे या दोघींचे सदस्यत्व रद्द झाले आहे. तर दोन प्रकरणे शिल्लक आहेत.
निवडणुकीला दीड वर्षे कालावधी शिल्लक असताना सत्ताबदल करण्यासाठी येथे विरोधात असलेल्या काँगेसने जोरदार हालचाली केल्या होत्या. सोमवारी होत असलेल्या सरपंच निवडीने येथील सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे नसून आणखी दोघांचे सदस्यत्व रद्द झाल्यावर काय बदल होतील आणि पुन्हा पोटनिवडणूक होईल काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
गावाचा विकास करण्यासाठी पक्षभेद विसरून सर्व सदस्य झटत असतील तरच तिथे योग्य पद्धतीने कारभार चालतो. मात्र निव्वळ सत्ता टिकवून ठेवणे किंवा विरोध करणे यासाठीच सर्व शक्ती लावली जात असल्यामुळे कढोली खुर्द या नऊ सदस्य असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतीची दुर्दशा पाहायला मिळत आहे. सक्षम नेतृत्वाअभावी गावचे राजकारण कोणत्याही थराला जाण्याची शक्यता असून नव्यानेच येथे बाळसे धरू पाहणाऱ्या भाजपाची भूमिका महत्वाची ठरू शकते.
( कढोली खुर्द गाव आणि ग्रामपंचायत व्हिडीओ अवश्य पहा )