By : मोहन भारती
बिबी : देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ हा तो दिवस आहे, जेव्हा भारतातील जनतेने इंग्रजांच्या प्रदिर्घ गुलामगिरीतून मोकळा श्वास घेतला. या वैविध्यपूर्ण देशात सर्व धर्म आणि जातीचे लोक एकत्र येतात आणि दरवर्षी स्वातंत्र्य दिन पूर्ण उत्साहात आणि आनंदाने साजरा करतात.
एकलव्य इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ७८ व्या स्वातंत्र्य दिनापासून शाळेने एका नवीन उपक्रमाची सुरुवात करत स्वातंत्र्य दिनाला झेंडा फडकविण्याचा मान दहावीला शाळेतून प्रथम क्रमांकाने पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्याचे ठरविले.त्यानुसार पूजा थेरे रा. आवाळपूर या मुलीने नुकत्याच लागलेल्या निकालात ९२℅ मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. तिचे वडील कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले विठोबाजी थेरे यांना झेंडावंदन करण्याचा मान मिळाला. विद्यार्थ्यांची देशाच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित भाषणेही झालीत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले इमरानजी शेख यांच्याकडून संतोषी पेचे वर्ग ९ वा हिने सुंदर कविता सादर केल्याबद्दल पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले विजय कोल्हे यांच्याकडून रितिका पवार वर्ग ९ वा या विद्यार्थिनीने उत्तम भाषण दिल्याबद्दल तिला पारितोषिक देऊन प्रोत्साहित करण्यात आले. माही नगराळे या विद्यार्थिनीने उत्तम नाटिका सादर केल्याबद्दल तिला रामदास जीवने यांच्याकडून पारितोषिक देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदासजी देरकर, शाळेचे मुख्याध्यापक नितेश शेंडे, तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक अखिल अतकारे, प्रमुख पाहुणे म्हणून वामन गेडाम आदी उपस्थित होते. तसेच प्रास्ताविक शाळेचे प्रभारी विठ्ठल टोंगे, संचालन प्रिया चौधरी, तर आभार प्रदर्शन आफताब शेख यांनी मानले. कार्यक्रमात शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.