पोंभुर्णा येथे भाजपाचे मंडळ संमेलन

By : Devanand Sakharkar

पोंभुर्णा :  भारतीय जनता पक्ष सच्च्या कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे. पोंभुर्णा शहरात पक्षाचा संघटनात्मकदृष्ट्या विस्तार करताना सर्व, जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र आणून, त्यांना सोबत घेऊन संघटना मजबूत करा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*

पोंभुर्णा शहरातील राजराजेश्वर सभागृहामध्ये भाजपा मंडळ संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, नगरपंचायतचे उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, गुरुदास पिपरे, संजय गजपुरे, ज्योती बुरांडे, वैशाली बोलमवार यांच्यासह तालुक्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, बाजार समितीचे सर्व संचालक, नगरपंचायतचे नगरसेवक, नगरसेविका, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना ‘मेरा बुथ सबसे मजबूत, मेरी पार्टी सबसे मजबूत’ हे उद्दिष्ट्ये ठेवून कार्य करण्याचा मंत्र दिला. ‘संघटना मजबूत करण्यासाठी माणसांना जोडणे आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने काम करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने काम करा. गोरगरीबांची सेवा करण्याची भावना ठेवा. स्वत:ची जबाबदारी लक्षात घेऊन संघटना बांधणीचे काम करा,’ असेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

सतत पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक रुपयात पीकविमा योजना आणली. चंद्रपुरातील शेतकऱ्यांची पीकविम्याच्या रकमेसाठी अडवणूक होत होती. मी यासंदर्भात शब्द दिला होता. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे मी म्हणालो होतो. शब्द दिल्यानुसार आता ३१ ऑगस्टपर्यंत चंद्रपुरातील शेतकऱ्यांच्या विम्याचा दावा निकाली काढण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांवरील अन्याय आपण खपवून घेणार नाही, असे मी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते, याचाही ना.मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

*‘हर घर तिरंगा’ यशस्वी करा*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे पोंभूर्णा शहरात योग्य नियोजन करून जास्तीत जास्त नागरिकांना अभियानात सामील करण्याचे आवाहन देखील ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कुणीही वंचीत राहू नये यासाठी बहिणींना सहकार्य करणे, वयोश्री योजनेतून ज्येष्ठांना 3 हजार रुपये मिळावेत यासाठी तसेच मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेचा तरुणांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन केले.

*जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय नाही*

पक्ष संघटन वाढविताना पक्षात नवीन लोकांचा समावेश करताना जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. पोंभुर्णा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर तालुक्यातील कार्यकारीणी पूर्ण करणे, बुथनिहाय कार्यकारिणीची पुनर्रचना करणे आणि जनतेपर्यंत शासनाच्या सर्व योजनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने कार्य करण्याची सूचना केली.

*विरोधक भ्रम निर्माण करत आहेत*

भाजपने कायम विकासाचे राजकारण केले. जातीचे राजकारण केले नाही. विकास करताना पक्षाकडून कधीही भेदभाव केला जात नाही. केंद्रात देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्यात महायुतीचे सरकार अनेक कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबवित आहे. मात्र विरोधक लोकांमध्ये भ्रम पसरवित आहे. हा भ्रम दूर करण्याची जबाबदारी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे असेही ना. मुनगंटीवार म्हणाले..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *