लोकदर्शन चंद्रपूर 👉 शिवाजी सेलोकर
*चंद्रपूर, दि.१६ – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी किल्ले रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळ्याची शोभा वाढावी यासाठी चांदीची पालखी भेट दिली होती. त्याबद्दल रायगड येथील श्री शिवराज्यभिषेक दिनोत्सव सेवा समितीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन सेवा समितीच्या शिष्टमंडळाने त्यांचे आभार मानले.*
शिष्टमंडळात श्रीशिवराज्यभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार, सचिव समीर धारेकर, खजिनदार राजू देसाई, कार्याध्यक्ष सनी ताठेले, रंजन गावडे आदी उपस्थित होते. समितीद्वारे ना. मुनगंटीवार यांना पत्र देत देखील कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ना.सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीशिवराज्यभिषेक दिनोत्सव सेवा समिती यांच्याकडून करण्यात आलेल्या सन्मानाचा स्वीकार केला व शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी पुढील काळातही सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले.
श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड ही संस्थेद्वारे मागील २९ वर्षांपासून श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सोहळा साजरा केला जातो. शाही इतमामात उत्साहात दुर्गराज रायगडावर हा सोहळा साजरा होतो. तिथीनुसार साजरा होणारा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा वेदमंत्रघोषात, परंपरेप्रमाणे विधीवत धर्मसंमत साग्रसंगित संपूर्ण सर्वसंपन्न होत असतो. या सोहळ्यासाठी चाळीस ते पन्नास हजार शिवभक्त संपूर्ण महाराष्ट्रातून किल्ले रायगडावर येत असतात. या सोहळ्याची शोभा वाढावी या उद्देशाने श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीद्वारे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना चांदीची पालखी भेट देण्याबाबत विनंती केली होती.
किल्ले रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळ्याची शोभा वाढावी यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीशिवराज्यभिषेक दिनोत्सव सेवा समिती यांच्या विनंतीस मान देऊन चांदीची पालखी भेट दिली. याबद्दल समितीद्वारे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या वतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.
*वर्षभर उपक्रम*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष राज्य सरकारच्या वतीने साजरे केले गेले. सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात आले. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ना. मुनगंटीवार यांनी रायगडावर शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट दिली होती. याशिवाय मुंबई येथे पुरातत्त्व विभागामार्फत आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, विशेष लोगोचे प्रसारण करून शासकीय कामकाजात त्याचा वापर आदी कल्पक कामे ना.सुधीर मुनगंटीवार पुढाकाराने करण्यात आली.