By : Shankar Tadas
राजुरा / चंद्रपूर, 6 एप्रिल : ना. सुधीर मुनगंटीवर हे अत्यंत कर्तृत्ववान, जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडविणारे नेते आहेत. सैनिकी स्कूल, बॉटनिकल गार्डन, वनअकादमी,रस्ते व पुलांचे बांधकाम तसेच बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आदी क्षेत्रांत काम करून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली आहे. आता अॅडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळवून देण्याचे स्वप्न देखील त्यांनी बाळगले आहे. सुधीरभाऊंकडे चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन आहे म्हणूनच हे शक्य होत आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी काढले. त्याचवेळी ना. मुनगंटीवार यांना प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन देखील हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला केले.*
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी राजुरा येथे केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला ते संबोधित करत होते. यावेळी प्रचार सभेला मंचावर विविध मित्र पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यात भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,देवराव भोंगळे माजी भाजपा जिल्हाध्यक्ष , माजी आमदार अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा नेते खुशाल बोंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, आरपीआय आठवले गटाचे गौतम लोडे, पी.री.पा.कवाडे गटाचे हरीश दुर्योधन, रासप जिल्हाध्यक्ष रमाकांत यादव, सुधीर घुरडे, सुनील उरकुडे, बबन निकोडे, नारायण हिवरकर, केशव गिरमाजी, महेश देवकते, अमर बोडलावार, अरुण मडावी, विजयालक्ष्मी डोहे, सतीश उपलेंचीवार, चेतनसिंग गौर, सुरेश रागीट, अमोल आसेकर, विवेक बोढे, नामदेव डाहुले यांचा त्यात समावेश होता.
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवसानिमित्त गत आठवणींना उजाळा देताना नितीन गडकरी यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘देशाला विश्वगुरू व जगाची ताकद करण्याच्या’ स्वप्नाला उजाळा दिला. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.
मतदारसंघातील समस्या, गरिबी, भूकमारी, बेरोजगारी ती दूर करायची असेल, तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा असेल, शेतकरी, शेतमजूराचे आयुष्य बदलायचे असेल, चंद्रपूरला राज्यातील पहिले विकासीत राज्य करायचे असेल तर ना. सुधीर मुनगंटीवार हाच एक पर्याय आहे, असे ना. नितीन गडकरी म्हणाले.
मा.सुधीर मुनगंटीवार म्हणाले केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी हे रस्ते व पायाभूत सुविधांची थाली आहे, अशा शब्दात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वत: नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असताना नितीन गडकरी प्रचारसभेला उपस्थित राहिल्याबद्दल ना. मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले. विकासाच्या आघाडीला कॉंग्रेसचे पंक्चर चाक लावले तर मग मात्र चंद्रपूर लोकसभेला देवही वाचवू शकणार नाही, असे सांगताना ना. मुनगंटीवार यांनी जनतेने मला निवडणून दिले तर जीव ओतून काम करेल, मतदारसंघाचे प्रश्न सोडवेल, सर्वांना अभिमान वाटेल असे काम करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी बंडू हजारे, अबिद अली, नितीन भटारकर, संजय धोटे, सुदर्शन निमकर, देवराव भोंगळे यांचे भाषणे झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण मस्की यांनी केले.
*‘ट्रिपल इंजिन’ साधेल चंद्रपूरचा विकास*
चंद्रपुरात खनिज संपत्ती, वन संपत्ती, सिमेंट फॅक्टरी असून देशातील उत्तम दर्जाचे लोखंड उपलब्ध आहे. त्याचे उद्योग चंद्रपूर गडचिरोलीत उभारायचे असून पुढील पाच वर्षात 2 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवूणूक येथे येणार आहे. बांबूपासून इथेनॉल, कोळशापासून मिथेनॉल तयार करण्याचे उद्योग ग्रामीण भागात सुरू करायचे असून त्यामाध्यमातून युवकांना रोजगार द्यायचा आहेत. चंद्रपुर जिल्ह्यात सर्वाधिक 474 किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून राजुरा भागाला अडीच हजार कोटी रुपयांची कामे दिली आहेत. या जिल्ह्याचा विकास पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांचे ‘ट्रिपल इंजिन’च साधू शकेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.