By : Shankar Tadas
लोकसभा विशेष
नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी महायुती व महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी व्यक्त करून येथील राजकारण चांगलेच तापविले आहे.
उमेदवारांच्या बाबतीत नाशिक लोकसभा क्षेत्र श्रीमंत आणि भाग्यशाली म्हणावे लागेल. कारण येथे दोन्ही बाजुनी तुल्यबळ असलेल्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर केल्याने विजय करंजकर नाराज असून काहीही झाले तरी आपण लढणारच अशी त्यांची उघड भूमिका आहे. सलग दोनदा खासदार राहिलेले गोडसे यांनी आपली दावेदारी सांगणे स्वाभाविक असले तरी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे. भाजपाने आधीच शांतीगिरी महाराज आणि स्वामी श्रीकंठानंद या दोन्ही स्वामींना आशा दाखवून ‘तयारीला लागा’ असे संकेत दिले होते. स्वामी शांतीगिरी यांचा चाहता वर्ग आग्रही दिसून येत असतानाच ‘राजकारण शुद्धी’साठी नव्यानेच रिंगणात उतरलेले स्वामी श्रीकंठानंद हेसुद्धा माघार घेतील असे वाटत नाही. ते मागील अनेक वर्षांपासून इगतपुरी क्षेत्रात असलेल्या श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थानच्या माध्यमातून नाशिकसेवेत रमलेले संन्याशी असून अनेक ठिकाणी दिलेल्या भाषणात त्यांनी आपल्या सेवाप्रवण विचारांनी लोकांची मने जिंकली आहे. स्थानिक मीडियाने त्यांच्या कार्याची प्रसंशा करीत ‘नाशिकचे कर्मयोगी’ अशी ओळख करून दिली आहे. स्वामी विवेकानंदांचा ‘शिवभावे जीवसेवा’ हा मंत्र अंगीकारलेले स्वामी श्रीकंठानंद लोकआग्रहास्तव लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज झाल्याचे सांगतात. भाजप प्रवेशानंतर त्यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची आशा होती. मात्र महायुतीतील शिवसेना आणि इतर प्रस्थापित इच्छुकांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. सध्याच्या पोटार्थी राजकारणापासून नाशिक क्षेत्राला मुक्ती देण्यासाठी देशभक्तीने प्रेरित निस्वार्थी नेतृत्व नाशिकला देण्याचा त्यांचा हेतू शुद्ध असला तरी आपली भूमिका लोकांना पटवून देण्यात ते किती यशस्वी ठरतात यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
नाशिक लोकसभा क्षेत्रात तीन आमदार आणि 68 नगर सेवक असलेल्या भाजपाची ताकद कमी नाही. म्हणून अपक्ष म्हणून कोणीही मैदानात उतरले तर तगड्या उमेदवाराचा सामना त्यांना करावाच लागेल.
त्यातच आम आदमी पार्टीतून निलंबित झालेले जितेंद्र भावे यांनी स्वतःचा निर्भय महाराष्ट्र पक्ष काढून थेट लोकसभेकरिता रणशिंग फुंकले आहे. सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण एक सक्षम उमेदवार असल्याचे त्यांनी आपल्या कृतीमधून पटवून दिलेले आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून अगदीच अल्प काळात त्यांनी नाशिकच नव्हे तर राज्यात वेगळ्या राजकारणाची आशा जागविली आहे. नाशिकमध्ये तिरंगी नव्हे तर चौरंगी लढतही होऊ शकते. त्यामुळे येथे कोण बाजी मारेल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष राहील, यात शंका नाही.
#नाशिकलोकसभा #jitendrabhave #swamishrikanthananda #swamishantigiri #nashikloksabha #maharashtraloksabha