लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर -महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1981 मधील नियम 36 परिशिष्ट -4 नुसार महाविद्यालय शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तिका देणे गरजेचे आहे. मात्र नियमाप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत प्राप्त होत नाही असे निदर्शनास येते.त्यामुळे गोंडवाना विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांना त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याबाबत विद्यापीठाने परिपत्रक काढावे अशी मागणी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे अधक्ष डॉ.संजय गोरे आणि सचिव डॉ.विवेक गोरलावार यांनी कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे आणि प्र कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांचे कडे केली आहे.
सेवा पुस्तिका हा कर्मचाऱ्यांच्या सेवेचा अत्यंत महत्त्वाचा अभिलेख असून सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आत्मा आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तिका मिळणे आवश्यक आहे.त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तके ची प्रत दिली आहे अथवा नाही याबाबत आपण माहिती घेऊन दिली नसल्यास महाविद्यालयांना दुय्यम सेवा प्रत देण्याबाबत सक्ती करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेचा तपशीलाची नोंद होणे गरजेचे आहे. सेवा पुस्तिकेत व्यक्तिगत माहिती,वार्षिक वेतन वाढ,स्थाननिश्चिती, विमायोजना,आणि रजानोंदी या घटकांचा परिपूर्ण व अद्यावत उल्लेख होणे महत्त्वाचे आहे सेवापुस्तिका कर्मचाऱ्यांच्या सेवेचा महत्त्वाचा दस्तावेज असून सेवा पुस्तिका अपूर्ण असेल तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेचा लाभ मिळण्यास अनेक अडचणी येतात. सेवेत असताना एखादी दुर्घटना झाल्यास त्यांच्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागतो सेवा पुस्तके ची दुय्यम प्रत अद्यावत करून दिल्यास कर्मचाऱ्यांच्या सेवाकार्यातील नोंदी व तपशील जतन करून ठेवणे सोपे जाते व सेवानिवृत्तीचे लाभ परिपूर्ण प्राप्त होण्यास मदत होते. तरी
महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत मिळण्याबाबत विद्यापीठ मार्फत ठोस अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून गोंडवाना यंग टीचर्स संघटनेने केली आहे.