By : Rajendra Mardane
चंद्रपूर : भाजपाच्या वतीने चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना निश्चित झाली तेव्हापासून इंडिया आघाडीच्या उमेदवारीबाबत विविध चर्चा सुरू असतानाच चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत एकजुटीने लढण्याचे सुतोवाच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.
चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे. पक्षाचे टिकीट मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे टिकीट मागणीसाठी प्रयत्न केल्याने पक्षात गटबाजी आहे, असे समजू नये. पक्षश्रेष्ठी ज्या कोणाला उमेदवारी देईल त्यांना निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असे प्रतिपादन राजूरा विधानसभेचे आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केले. येथील एन डी हॉटेल मध्ये इंडिया आघाडी तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सुभाष धोटे म्हणाले की, भारतीय जनता पक्षा तर्फे नुकतीच उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचा उमेदवार अजून निश्चित झाला नसला तरी आगामी दोन – चार दिवसात उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा होईल. काँग्रेस पक्षश्रेष्ठीं जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे स्वागत होईल. तत्पूर्वी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतर पुन्हा जोमाने कामाला लागू.
या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर भर राहील यावर बोलताना ते म्हणाले की, भाजपा विरोधात प्रचाराचे अनेक मुद्दे असून त्यात ‘महागाई’ , ‘मोदी की गांरटी ‘ आदी बाबत प्रकर्षाने आवाज उठविण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व लोकसभेचे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात बोलताना ते म्हणाले की, मुनगंटीवार यांनी ९० लाखाच्या काष्ठासाठी ३ कोटी खर्च केले. एकीकडे कंत्राटी कामगारांना महिनोन्महिने त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाही दुसरी कडे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाने कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. इतकेच नव्हेतर पालकमंत्री केवळ चंद्रपूर व आपल्या मतदारसंघात कार्यक्रम घेत आहे. इतर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ते कार्य करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. याचा जाब विचारण्यात येईल. सुधीर मुनगंटीवार यांना भाजपा तर्फे लोकसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे काम अधिक सोपे झाले आहे, असे ते म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सावध पवित्रा घेतला व पक्षाच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचे त्यांनी टाळले.
पत्रकार परिषदेत लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक आमदार प्रतिभा धानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गटाचे) राजेंद्र वैद्य, शिवसेना ( उबाठाचे) संदीप गिऱ्हे, घनश्याम मुलचंदानी, आम आदमी पार्टीचे मयूर राईतवार, अमित ठाकरे, रामू तिवारी, नम्रता ठेमस्कर आदी उपस्थित होते.