By : Devanand Sakharkar
चंद्रपूर : 2027 पर्यंत कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याकरीता जिल्ह्यात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कुष्ठरोग जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज (दि.10 फेब्रुवारी) शहरात “रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन”चे आयोजन महानगरपालिका येथून करण्यात आले. रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन मध्ये 333 नागरिकांनी सहभाग घेतला.
सदर मॅरेथॉनचा उद्देश लोकांपर्यंत कुष्ठरोगाबाबत असलेले समज, गैरसमज दूर करणे व जनसामान्यांमध्ये कुष्ठरोगाबाबत जनजागृती करणे हा आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे,( सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, डॉ. बंडू रामटेके, डॉ. हेमचंद्र किन्नाके, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. कांचन टेंभुर्णे आदी सहभागी झाले होते.
कुष्ठरोग हा प्राचीन काळापासून चालत आलेला मायकोबॅक्टेरियम लेप्री तंतुमुळे होणारा एक अत्यंत सांसर्गिक आजार आहे. कुष्ठरोग हा मुख्यतः चेतातंतू व त्वचेचा रोग आहे. कुष्ठरोग आजारामध्ये त्वरित उपचार व योग्य काळजी न घेतल्यास कायमची विकृती येते. त्यामुळे समाजात अशा व्यक्तीबद्दलची भीती, अवहेलना व कलंकाचे मूळ कारण आहे. कुष्ठरोग हा अनुवंशिक आजार नाही. कुष्ठजंतूचा प्रसार हा उपचार न घेतलेल्या सांसर्गिक कुष्ठरुग्णांच्या खोकल्यातून, शिंकण्यातून हवेत पसरतात. आणि निरोगी व्यक्तीला श्वसन मार्गातून कुष्ठजंतूचा संसर्ग होतो. वेळीच उपचार न घेतल्यास कुष्ठरोगामुळे चेतातंतू बाधित होऊन कायमची शारीरिक विकृती येऊ शकते व अवयव अकार्यक्षम होतो. कुष्ठरोगामध्ये फिकट, लालसर व उंचलेले चट्टे तसेच त्वचा तेलकट व गुळगुळीत होते. कानाच्या पाड्या जाड होतात व काही रुग्णांच्या चेहऱ्यावर, हातापायावर सूज येते किंवा शरीरावर गाठी येतात.
*लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्या:*
कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास आपल्या विभागातील सीएचव्ही, आरोग्य कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी किंवा नजीकच्या सरकारी दवाखान्यात जाऊन तपासून घ्यावे. सर्व सरकारी, निमसरकारी दवाखाने, मनपा मधील सर्व आरोग्य केंद्र व दवाखान्यांमध्ये मोफत उपचार उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने बहुविध औषधोपचार हा 6 किंवा 12 महिने नियमित घेऊन पूर्ण केल्यास कुठल्याही स्थितीत कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होतो व संभाव्य विकृती टाळता येते.
*मॅरेथॉनमध्ये विजेत्यांना बक्षीस वितरण:*
“रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन” मध्ये सहभागी सहभागी झालेले पुरुष गटातून प्रथम क्रमांक प्राप्त विजेते क्रिश सतींदर मिस्त्री, द्वितीय पुरस्कार प्राप्त रितिक दशरथ शेंडे, तृतीय पुरस्कार प्राप्त शिवाजी नंदकिशोर गोस्वामी तसेच महिला गटातून प्रथम पुरस्कार प्राप्त आचल रमेश कडूकर, द्वितीय पुरस्कार प्राप्त तेजस्विनी पवनकुमार कामडे तसेच तृतीय पुरस्कार प्राप्त रुचिका सुनील नागरकर यांना सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.