लोकदर्शन मुंबई..👉 स्नेहा उत्तम मडावी
सुप्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची सेन्सॉर बोर्डच्या सदस्य पदी निवड याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सेन्सॉर बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भाकर यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे.
गेल्या २० वर्षांपासून कदम हे चित्रपटसृष्टी मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या वाक्या ह्या सामाजिक चित्रपटाला २४ पुरस्कार मिळाले आहेत. पुरूषा ह्या चित्रपटाला १४ पुरस्कार मिळाले आहेत. कदम यांनी २० चित्रपट दिग्दर्शित केलेत. त्यांनी नामांकीत कंपनीच्या जाहिराती मालिका केल्या आहेत. नगरसेवक एक नायक, एका लग्नाची गोष्ट, अट्रॉसीटी, आयपीएल हे गाजलेले चित्रपट आहेत.
खांबाळे येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात पुढील शिक्षण घेऊन त्यांनी थेट मुंबई गाठली. मूळातच अभिनयाची आवड असल्याने विद्यार्थी दशेतच त्यांनी संगीत नाटकांच्या माध्यमातून गावातच मित्रमंडळीना सोबत घेऊन अनेक एकांकिके सारखे प्रयोग सादर केलेत. मुंबई सारख्या मोठ्या शहरात माणसे नोकरी मिळेल या आशेने जातात परंतु कदम ही गेले आणि त्यांनी एका नामांकित कंपनीत जाहिरात विभागात काही वर्षे नोकरी केली.
नाटकाची आणि अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांच्यातील कलाकार स्वस्त बसत नव्हता.त्यांनी नोकरी सोडून आपल्यातील गुणवत्तेच्या बळावर अभिनय क्षेत्रात आपले करिअर निवडले. या प्रसंगी त्यांना आई-वडिलांची भक्कम साथ लाभली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन त्यांच्या पत्नी ऋचा दीपक कदम यांच्या पाठबळावर ते आजही एक कलाकार ते यशस्वी सिने-नाट्य दिग्दर्शक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या प्रगतीचा आलेख नेहमीच उंच राहिलेला आहे.आपल्या मातीशी त्यांनी नाळ कधी तुटू दिली नाही आई-वडीलांनी चांगले संस्कार केल्यामुळे ते आजही गावी येऊन शेतीत रमलेले पाहायला मिळते.
चित्रपट कला क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे त्यांची केंद्रीय स्तरावर दखल घेऊन सेन्सॉर बोर्डच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.
सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सीबीएफसी ही एक सरकारी मान्यताप्राप्त संस्था असून, माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत या संस्थेचे काम चालत. ही संस्था देशातील सिनेमांना प्रमाणपत्र देण्याचं काम करते. सिनेमॅटोग्राफी ऍक्ट 1952 मधील तरतुदींनुसार सिनेमाच्या प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र दिलं जात.भारतातील कोणताही सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी लागते.सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केंद्र सरकार (माहिती आणि प्रसारण मंत्रालय) कडून केली जाते. यातील सदस्य हे कोणत्याही हुद्यावर नसतात. सेन्सॉर बोर्डाचं मुख्यालय मुंबईत आहे आणि देशभरात ९ क्षेत्रीय कार्यालयही आहेत. सेन्सॉर बोर्डच्या स्थापनेला ६३ वर्षे झाली आहेत. सध्या या सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष कवी-गीतकार प्रसून जोशी हे २८ वे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
चित्रपट परीक्षण हे अभ्यासपूर्ण आणि सखोल कसे करता येईल आणि निर्मात्यांच्या मूल्यांकनाची बाजू लक्षात घेऊन परीक्षण केले जाईल असे सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांनी सांगितले