लोकदर्शन लंडन 👉 शिवाजी सेलोकर
*लंडन, दिनांक ४* : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आज केले.
शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याच्या संकल्प राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता; त्यानुसार वाघनखे आणण्याचा सामंजस्य करार मंगळवारी संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून बोलत होते. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री ना उदय सामंत, मुख्यमंत्री यांचे व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, पुरातत्व विभागाचे संचालक श्री. तेजस गर्गे, मंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.अमोल जाधव, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट, भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, त्यांचे सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघ नखं शिवभूमीत आणत आहोत, हा दुग्धशर्करा योग असून शिवस्पर्श झालेली ही वाघनखं आपल्यासाठी अनमोल आहेत. असेही ना. एकनाथ शिंदे म्हणाले.शिवराज्याभिषेकाच्या निमित्त सांस्कृतिक कार्य विभागानं हा संकल्प केला आणि तो पूर्णत्वासही नेला, त्याबद्दल मुख्यमंत्री यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आयुष्यातील महत्वाच्या आणि संस्मरणीय प्रसंगापैकी एक असा आजचा हा प्रसंग आहे. रयतेच्या रक्षणासाठी मृत्यूच्या दाढेत स्वतःला झोकून ज्या क्रूर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला ती वाघनखं माझ्या शिवबाच्या मातृभूमीत, महाराष्ट्रात शिवप्रेमींच्या दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय हा अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देव जरी नव्हते तरी आमच्यासाठी देवापेक्षा कमी नक्कीच नाहीत; ते आमचा स्वाभिमान आहेत, ती आमची प्रेरणा आहे, ती आमची ऊर्जा आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्ष्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केलेला संकल्प मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात पूर्णत्वाकडे जातोय याचा अतिशय आनंद होतोय असे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ना. मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासन आणि लंडनच्या व्हिक्टोरिया अँण्ड अल्बर्ट म्यूझियम यांच्या दरम्यान जो MOU झाला, त्यानुसार ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे.
ना. श्री सुधीर मुनगंटीवार करारासाठी संग्रहालयात जाण्यापूर्वी त्यांचे लंडन येथील मराठी बांधवांनी मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले; त्यानंतर संग्रहालयातील इतर सर्व वस्तू बघत असताना शिवकालीन तसेच भारतातील इतर वस्तूंची त्यांनी कुतूहलाने माहीती जाणून घेतली. त्यानंतर स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.