लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – गावातील ज्येष्ठ नागरिक हेच गावातील विकासाचा महत्त्वाचा कणा आहे. गावातील संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थलांतरित होत असतात. आणि त्यातूनच गावाच्या विकासाची खरी दिशा ठरत असते. जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे गाव विकासात ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ‘होय आम्ही म्हातारे नाही तर ‘महा’तारे’ या मथळ्याखाली ‘ज्येष्ठ नागरिकांचे स्नेह मिलन व अनुभव कथन’ या कार्यक्रमाचे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी आयोजन पार पडले.
जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीच्या वतीने ग्रामस्वच्छता व दिवसभर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर राबवून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब मोहितकर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल थिपे, सेवानिवृत्त उपप्राचार्य अशोक जिवतोडे, बापूजी पिंपळकर, आनंद पावडे, शेख रशीद शेख करीम, देवराव आष्टेकर, सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच आशिष देरकर, पोलीस पाटील राहुल आसुटकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष स्वप्निल झुरमुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. शरद बेलोरकर यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मिळालेले आयुष्य बोनस समजून ज्येष्ठ नागरिकांनी जीवनाचा आनंद घ्यावा व सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन अध्यक्षीय भाषणातून बाळासाहेब मोहितकर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल टोंगे यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच आशिष देरकर यांनी केले तर आभार शामकांत पिंपळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.