लोकदर्शन 👉 प्रतिनिधी
*नागपूर, ता. 23 :* शनिवारी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नागपुरात दाणादाण उडविली. अनेक घरात, दुकानात पाणी शिरले. घरे उद्ध्वस्त झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य पोचविण्याचे आदेश देतानाच स्वयंसेवी संस्थांनीही मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला दाद देत नाम फाउंडेशन मदतीसाठी पुढे आले. नाम फाउंडेशनने दिलेली मदत खुद्द ना. नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित व्यक्तींकडे सुपूर्द केली.
नागपुरातील पूर परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून लक्ष ठेवून होते. ना. गडकरी हे सुध्दा वेळोवेळी माहिती घेत होते. उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी हे पहाटे पासून आपदग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करीत होते. आपदग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत होते. हजारी पहाड येथील योगेश व्हराडकर यांनी कर्ज घेऊन घेतलेल्या 14 म्हशी गोठ्यात बांधून होत्या. रात्री पावसाच्या पाण्यात बुडाल्याने सर्व म्हशींचा मृत्यू झाला. संदीप जोशी यांना हे दुःख पहावले नाही.
याच दरम्यान नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर यांनी नागपुरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. श्री. संदीप जोशी यांच्याशी संपर्क साधत नाम फाउंडेशन काय मदत करू शकेल याबाबत विचारणा केली. संदीप जोशी यांनी मृत पावलेल्या 14 म्हशीबाबत माहिती देताच नाम फाउंडेशन तर्फे एक लाख रुपये तातडीची मदत संबंधित म्हशीच्या मालकास देण्याचे जाहीर केले. ती मदत नागपुरात पाठविली आणि रात्री मनपा मुख्यालयात ना. नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ती योगेश व्हराडकर यांच्याकडे सुपूर्द केली.
नाम फाउंडेशन आता आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही कार्य करीत असून पूरपरिस्थिती उद्भवलेल्या अनेक शहरात वाखाणण्याजोगे कार्य केले आहे. नागपुरातील आवश्यक तेथे मदत पोहवविण्यासाठी नाम फाउंडेशन तत्पर असल्याचे नाम फाउंडेशनचे गणेश थोरात यांनी सांगितले. नाम फाउंडेशनने दाखविलेल्या तत्परतेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनीही नाम फाउंडेशनचे आभार मानले.