by : Rajendra Mardane
वरोरा : ” गणेशोत्सव आणि ईद निमित्ताने जोश उफाळून येणं हे स्वाभाविक आहे. त्यातून येणारी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही आपण समजू शकतो पण या प्रतिक्रियेलाही मर्यादा हव्यात. ‘ जोश ‘ असू द्या पण त्या सोबतीला ‘ होश ‘ ही असू द्यावा. म्हणजेच जोशकर्त्यांनी आपला विवेक जागा ठेवत उत्सवात जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे “, असे आवाहन चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी येथे केले. आगामी ‘ गणेशोत्सव ‘ आणि ‘ ईद मिलाद – उन- नबी ‘ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजातील एकोपा टिकून राहावा, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, उत्सव निर्विघ्नपणे व शांततेत पार पडावा यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने वरोरा पोलीस स्टेशनच्या वतीने येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात शांतता कमिटीचे सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस, पत्रकार व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
मंचावर सहा. पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी (भा.पो.से.), उपविभागीय अधिकारी डॉ. शिवनंद लंगडापुरे, तहसीलदार योगेश कौटकर, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक विशाल नागरगोजे, वरोरा ठाणेदार अमोल काचोरे, भद्रावती ठाणेदार विपिन इंगळे, माजरी ठाणेदार अजितसिंह देवरे, पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे, उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक परदेशी पुढे म्हणाले की, शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांकडून विविध योजना हाती घेतल्या जातात. यंदा ‘ गणेश मंडळ दत्तक योजना ‘ राबवायची आहे. ” एक मंडळ, एक पोलीस “, असे याचे स्वरूप आहे. यात प्रत्येक मंडळाचे पाच कार्यकर्ते देखील पोलिसांच्या मदतीला राहणार असून उत्सवात आमची मुख्य भूमिका वाहतूक नियंत्रणाची राहील, असे त्यांनी नमूद केले. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनावर दारुडा चालक ठेवू नका, दारू पिणाऱ्याला स्वतःचेच भान नसते, मिरवणुकीत कोणी दारू पिऊन येऊ नये. आल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. ‘ अनंत चतुर्दशी ‘ ३० सप्टेंबरला आणि ‘ ईद मिलाद – उन- नबी ‘ उत्सव २८ सप्टेंबर रोजी साजरा होणार, असे परदेशी यांनी सांगितले.
डॉ. लंगडापुरे पुढे म्हणाल्या की, गणेशोत्सव मंगलमय वातावरणात, विविध स्पर्धांचे आयोजन करून, लोकांना अधिक प्रोत्साहन देऊन शांततेत साजरा करू या. १८ वर्षावरील मतदारांची नोंदणी सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असून त्याच्या जनजागृतीसाठीचे बॅनर यावर्षी प्रत्येक गणेश मंडळाने मंडपात लावावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहरात दिनांक २८ सप्टेंबरला ईद मिलाद – उन – नबी ‘ व २८ ऐवजी ३० सप्टेंबरला गणेश विसर्जन करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी, विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी तसेच शांतता कमेटीतील सदस्यांनी योग्य सूचनांसह सकारात्मक चर्चा केली.
प्रास्ताविकात नोपानी यांनी धार्मिक उत्सव शातंतेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला यथोचित सहकार्य करा, असे आवाहन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली, सामाजिक कार्यकर्ते सैय्यद आसिफ रजा, ओम मांडवकर, बाबा भागडे, विलास नेरकर, सुनंदा जीवतोडे, डॉ.सागर वझे, रमेश राजूरकर, मुकेश जीवतोडे, जयंत टेमुर्डे, अमित चवले, प्रवीण चिमूरकर, माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते छोटुभाई शेख व राजेंद्र मर्दाने, जेष्ठ नागरिक संघाचे मारोतराव मगरे, प्रशासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, गणेश मंडळ तसेच स्वंयसेवी संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार व अन्य मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.
सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे यांनी केले. ठाणेदार अमोल काचोरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरोरा पोलीस स्टेशन मधील पो. उप निरीक्षक वर्षा तांदूळकर, गोपनीय विभाग प्रमुख राजेश वऱ्हाडे, पोलीस कॉन्स्टेबल धनपाल मेश्राम, दीपक मोडक, दिनेश मेश्राम, सूरज मेश्राम, राम नैताम ( भद्रावती ) इ.नी अथक परिश्रम घेतले.