लोकदर्शन चंद्रपूर( प्रतिनिधी)- 👉प्रा.अशोक डोईफोडे
झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समिती , चंद्रपूर जिल्हा शाखा आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ ,राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सुप्रसिद्ध साहित्यिक दिवंगत प्राचार्य मदन धनकर यांना आभासी पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक एड. लखनसिंह कटरे होते. प्राचार्य मदन धनकर आमचे मित्रश्रेष्ठ होते, त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रातील हानी कधीच भरून न निघणारी आहे,असे एड. कटरे म्हणाले.
प्राचार्य धनकर यांनी झाडीबोली साहित्य मंडळ , गुरुदेव सेवा मंडळ यासारख्या असंख्य संस्थाना जोडून घेतले होते.ते अनेकांचे मार्गदर्शक होते. त्यांनी अनेकांना लिहिते केले,असे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर म्हणाले तर
झाडीपट्टीतील नाट्यपरंपरा, तेथील लोकसंस्कृतीचा उत्तम अभ्यास प्राचार्य धनकर यांना होता. चंद्रपूरात संपन्न झालेले पर्यटन महोत्सव आणि अ.भा. मराठी संमेलन प्राचार्य धनकर यांचेमुळे संस्मरणीय ठरले असे पद्मश्री डॉ. परशुराम खुणे म्हणाले. प्राचार्य धनकर यांनी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असल्याचे डॉ. धर्मा गांवडे म्हणाले.
प्राचार्य धनकर यांची भाषणे ऐकण्यासारखी असत, असा अभ्यासपूर्ण वक्ता यापुढे होणार नाही, असे मनोगत चंद्रपूर झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष कवी अरूण झगडकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावरील त्यांचे लेख आम्ही वाचलेले आहे. सेवा मंडळाच्या प्रचारकांशी ते वेळोवेळी संपर्क ठेवत असे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे केंद्रीय प्रचार समितीचे सदस्य एड. राजेंद्र जेनेकर म्हणाले . राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे प्रा.डॉ. श्रावण बाणासुरे, गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ . चंद्रकांत लेनगुरे, उपेंद्र रोहणकर, गोंडपिपरी शाखेचे रामकृष्ण चनकापुरे,सौ. संगीता बांबोळे,मुल शाखेचे लक्ष्मण खोब्रागडे आदींनी आपल्या भावना व्यक्त करून आदरांजली अर्पण केली. चंद्रपूर झाडीबोली शाखेचे सचिव प्रा. नामदेव मोरे यांनी प्रास्ताविक केले तर देवराव कोंडेकर यांनी आभार मानले.