लोकदर्श तालुका प्रतिनिधी👉 मनोज गोरे:
भारतीय जनता पक्षात गेल्या ३५ वर्षांपासून विविध पदांवर काम करीत असलेले नारायण हिवरकर यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोरपना तालुकाध्यक्षपदी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निवड करण्यात आली आहे. हिवरकर यांनी यापूर्वी पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्यांसोबतच कन्हाळगावचे सरपंच, उपसरपंच व तीन वेळा सदस्यपदी काम केले आहे. त्यामुळे त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, तालुक्यातील जवळपास दोन ते अडीच हजार उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ, दोन ते अडीच हजार नागरिकांना निराधार योजनेचा लाभ तसेच शासकीय विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
भाजपात शाखा अध्यक्ष पदापासून सुरुवात झाल्यापासून तालुका उपाध्यक्ष,भाजयुमोचे चार वेळा तालुकाध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. त्यानंतर भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष म्हणून गेल्या काही वर्षांपासून काम करीत असून, त्यासोबतच जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारीसुद्धा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पक्ष संघटनेतील कामासोबतच गरजवंत नागरिकांची कामे त्यांच्याकडून केली जात असून, या कार्याची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या शिफारशीने नारायण हिवरकर यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजपासोबतच नागरिकांमध्ये स्वागत केले जात आहे.