लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस येथे दि.4 ऑगस्ट 2023 रोजी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे प्रायोजित राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालविकास कोरपनाचे प्रकल्प अधिकारी श्री.गणेश जाधव, संरक्षण अधिकारी श्री. प्रदीप भोंगळे , नारिशक्ती चंद्रपूर च्या श्रीमती पाठक मॅडम , श्रीमती हिरुरकर मॅडम , चंद्रपूर सायबर सेल चे पोलीस अधिकारी श्री. मुजावर अली, श्री. रवींद्र शिंदे,पोलीस निरीक्षक, गडचांदूर तसेच महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती चिताडे मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरवात मान्यवारांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री. अली यांनी सायबर गुन्ह्यासंदर्भात खूप महत्वाची माहिती दिली.सायबर गुन्ह्यांची विविध उदाहरणे देऊन जाणते अजाणते पणी कसे गुन्हे होतात याचे सखोल व विस्तृत विवेचन त्यांनी आपल्या भाषणातून केले. मोबाईल कसा वापरावा याचे पण त्यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाईन वस्तू मागविताना कशी काळजी घ्यावी हे सुद्धा त्यांनी उदाहरणं देऊन स्पष्ट केले. फसवणूक झाली तर त्यावर खबरदारी म्हणून काय करता येईल त्या बद्दल देखील सविस्तर मार्गदर्शन केले. नारीशक्ती चंद्रपूर च्या पाठक मॅडम यांनी 15 ते 25 वयोगटातील मुलींनी समाजात वावरत असताना काय काळजी घ्यायची याची विविध उदाहरणे देऊन मुलींनी कसे सावध राहून आत्मसंरक्षण करावे याचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री. शिंदे, श्रीमती चिताडे मॅडम, तसेच श्री भोंगळे यांनी सुद्धा युवती स्वरक्षणा संदर्भात आपापले विचार मांडलेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र देव यांनी पण युवती स्वरक्षण कसे करता येईल, मुली आत्मनिर्भर कश्या होतील याबद्दल यथोचित मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनिस खान व संचालन श्री बांदरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद तसेच मोठ्या संख्येने विध्यार्थिनी उपस्थित होत्या.