लोकदर्शन तालुका प्रतिनिधी 👉 मनोज गोरे
कोरपना – कोरपना तालुक्यात मागील महिन्याभरापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे अनेक गावातील शेतशिवारातील शेतपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांचे तातडीने पंचनामे करून कोरपना तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसीलदार कोरपना यांना किसान युवा क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र गेजिक व सामाजिक कार्यकर्ते शुभम सुधाकर जेनेकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिले.
पैनगंगा ,वर्धा नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यात असलेल्या ११३ ही गावातील शेतशिवारातील कापूस ,सोयाबीन, तूर व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अधून मधून पुर परिस्थिती या पावसाळ्यात निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तीबार पेरणी करणे ही कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत वारंवार होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला गेला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा .तसेच शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पन्नास हजाराची आर्थिक मदत देण्यात यावी अशी अपेक्षा निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी कोरपना तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.