लोकदर्शन डोंबिवली 👉गुरुनाथ तिरपणकर
गेली तेहेतीस वर्षे समाजकार्यात स्वतःला झोकून दिलेल्या सस्थांपैकी एक नामांकित संस्था म्हणून *रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट* या संस्थेचं नाव कल्याण डोंबिवली परिसरात गाजलेलं आहे. याच कार्ययज्ञाचा, नववर्षाचा, एक भाग म्हणून *’अंकुर सामाजिक संस्था ‘* या नोंदणीकृत संस्थेत वास्तव्य करत असलेल्या निराधार मुलामुलींना आर्थिक सहाय्य करण्याव्यतिरिक्त कपडेलत्ते, आहार, शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय मदत अशा अनेक प्रकारांनी आपण मदत करू शकतो ही जाणीव क्लबच्या पदाधिकाऱ्यांना झाली.आणि या मदतीचा शुभारंभ म्हणून, रविवार दि.३०जुलै रोजी येथील विद्यार्थ्यांना अंतर्वस्त्रदान करण्याची मोहीम पार पाडण्यात आली. या साठीचा सर्व खर्च रोटरी प्रगती ट्रस्टच्या गंगाजळी द्वारेच करण्यात आला. अंकुर संस्थेच्या संचालिका श्रीमती अक्षता भोसले आपल्या मुलीच्या मदतीने सुमारे तीस पीडित मुलामुलींच्या निवासाची जबाबदारी आणि त्यांचे शिक्षण, आरोग्य, संस्कार यांची निगुतीने काळजी घेत आहेत. वस्त्रदान उपक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या रोटरी सहकारी मित्रांमध्ये क्लबचे अध्यक्ष दीपक काळे, सचिव मनोज ओक, संस्थापक सदस्य डॉ.प्रल्हाद देशपांडे आणि दत्ता कडुलकर, तसेच माजी अध्यक्षा दीपाली पाठक, अतुल गोखले, माजी अध्यक्ष श्रीधर गोडसे, खजिनदार मंदार कुलकर्णी आणि त्यांचे सुपुत्र कु.सुमेध आणि कु.सुजय यांचीही उपस्थिती होती.क्लबतर्फे झालेल्या या वस्त्रदान सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष काळे , डॉ. देशपांडे, श्री.गोडसे, सचिव श्री.मनोज ओक यांची उद्बोधनपर भाषणेही झाली. संचालिका भोसले मॅडमच्या आभार प्रदर्शनाने वरील सोहळा समाप्त झाला.