by : Shankar Tadas * 69 पदाकरिता झालेल्या परीक्षेत केवळ 41 उत्तीर्ण
कोरपना :
राजुरा, कोरपणा आणि जिवती तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा निकाल 21 जुलै रोजी रात्री जाहीर झाला. तीन तालुक्यातील एकूण 69 पदे भरायची असली तरी फक्त 41 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले. म्हणजे परीक्षा घेऊनही 28 गावांना पोलीस पाटील मिळण्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. या परीक्षेत एकूण 277 उमेदवार होते त्यापैकी 134 उत्तीर्ण झाले. त्यांची राजुरा येथे मुलाखत 20 गुणांकरिता घेण्यात आली. त्यापैकी अनेक उमेदवार कागदपत्रे तपासणीत आणि इतर कारणाने अपात्र ठरले. रिक्त जागा 69 असल्या तरी केवळ 41 उमेदवारच पोलीस पाटील पदाकरिता योग्य ठरल्याचे पोलीस पाटील निवड समितीने जाहीर केले आहे.
पोलीस पाटील पदाकरिता 80 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात 36 गुण उत्तीर्ण होण्याकरिता आवश्यक होते. मात्र याच परीक्षेत बहुतांश उमेदवार नापास झाल्याने 28 गावांचे पोलीस पाटील पद सध्या तरी रिक्त राहणार आहे. गावातीलच उमेदवारांना संधी असल्यामुळे मोजक्याच उमेदवारांनी पोलीस पाटील पदाकरिता अर्ज सादर केले होते. विविध गावांमध्ये आरक्षणही होते. मात्र इतर जातीच्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यानुसार बरेच उमेदवार अयोग्य ठरले आहेत.
गावाच्या दृष्टीने पोलीस पाटील पद अत्यंत महत्त्वाचे असल्याने किमान पात्रता असणे आवश्यकच असते. त्यामुळे शासनाने लेखी परीक्षा घेतली. दहावी उत्तीर्ण उमेदवार आहेत यानुसारच लेखी परीक्षा घेतली असण्याची शक्यता आहे. तरीही या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची योग्यता बहुतेक उमेदवारांमध्ये नाही. यामुळे ग्रामीण भागात खालावलेला शिक्षणाचा दर्जा अधोरेखित झाला आहे.