लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर, दि. ६ : भारत माता की जय… वंदे मातरम… जय श्रीराम… छत्रपती शिवाजी महाराज की जय… या घोषणांनी दाताळा मार्गावरील रामसेतूचा परिसर अक्षरशः दुमदुमला, निमित्त होते इरई नदीवरील रामसेतू या केबलस्टे पुलावर विद्युत रोषणाईच्या लोकार्पणाचे. बुधवार (दि.५ जुलै) संध्याकाळ चंद्रपूरकरांसाठी अनेक कारणांनी अविस्मरणीय ठरली. राज्याचे सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर हा प्रेमाचा आणि सर्वधर्मसमभावाचा सेतू असल्याची भावना व्यक्त केली. ‘सर्व धर्मांच्या धर्मगुरूंचे आशीर्वाद विद्युत रोषणाईच्या लोकार्पणाला लाभत आहेत. त्यामुळे इरई नदीवरील हा एक साधा पुल नसून तो प्रेमाचा आणि सर्वधर्मसमभावाचा सेतू आहे,’ असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
विद्युत रोषणाईच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भागवताचार्य मनीष महाराज, इंदरसिंग, मौलाना अतिकुर रहमान, भंते सुमन वंदू या धर्मगुरुंसह आ. सुधाकर अडबाले, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे , माजी महापौर सौ राखीताई कंचर्लावार, माजी उपमहापौर राहुल पावडे, नामदेव डाहुले, प्रकाश धारणे, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, सा.बा. विभाग (विद्युत) चे अधिक्षक अभियंता हेमंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता टांगले, कार्यकारी अभियंता (विद्युत) पुनम पाटील, उपकार्यकारी अभियंता (विद्युत) भुषण येरगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘हे केवळ रोषणाईचे लोकार्पण नव्हे तर नागरिकांमध्ये एकमेकांप्रती प्रेमाचा सेतू मजबूत करण्याचा सोहळा आहे. त्यामुळेच सर्वधर्मांच्या धर्मगुरुंचा आशिर्वाद आणि त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आहे. मुंबई, गोवा, दिल्ली येथील रोषणाई बघून आपल्याही शहरातील रामसेतुला झळाळी प्राप्त करून देता येईल, असा विचार मनात आला. त्यादृष्टीने येथील पदाधिकारी, नागरीक आणि अधिकारी यांच्या समन्वयातून या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.
दाताळा रोडवरील इरई नदीवर हा रामसेतु बांधण्याकरीता सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर चंद्रपूर महानगर पालिकेत रामसेतूच्या नावाचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. तसेच आज सर्वधर्मीय धर्मगुरुंच्या आणि हजारो नागरिकांच्या जल्लोषात हा सोहळा येथे होत असल्याचा मनापासून आनंद आहे.’ सेवा हाच खरा धर्म असून रामसेतूवरील विद्युत रोषणाईच्या कार्यक्रमाचे सर्व नगरसेवकांनी तसेच अधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन केले, अशी कौतुकाची थाप पालकमंत्र्यांनी दिली.
*‘रिव्हर फ्रंट’ची योजना*
रामसेतुच्या बाजुला बंधारा बांधण्याचे नियोजन आहे. त्यात बोटींगचा आनंद सुध्दा घेता येईल. पुढील वर्षापासून गणेश विसर्जनासाठी येथे ‘रिव्हर फ्रंट’ तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आता गणेशाच्या विसर्जनासाठी तसेच आरती करण्यासाठीही जागा उपलब्ध होईल, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.
*रोषणाईची वैशिष्ट्ये*
रामसेतुवर दर्शनीय विद्युत रोषणाई करण्यात आली असून यात प्रत्येक केबलला दोन लाईट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण केबल प्रकाशमय होतो. सेतूवर असे ६४ केबल रोप असून एकूण १२८ लाईट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. पुलाच्या मध्य भागी असलेल्या एच फ्रेमलासुध्दा चारही बाजुंनी प्रकाशमय करण्यात आले आहे. पुलाच्या सुरवातीला एलईडी स्क्रीन आहे. यात रामसेतुचे वर्णन आणि विविध झाँकीचे तसेच विविध शासकीय योजनांचे प्रक्षेपण करण्याची व्यवस्था आहे. विशेष दिन किंवा सणांच्या निमित्ताने ही प्रकाशयोजना रंगांनुसार बदलता येते, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
*जनताच विकासाची शिल्पकार*
जिल्ह्यातील विकासाची खरी शिल्पकार येथील जनता आहे. जनतेच्याच सहकार्याने यापेक्षाही दहा पटींनी अधिक विकास करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, असा निर्धार पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात होणारी विकासाची कामे ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण आणि देखभाल करण्यासाठी नागरिकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.