*शेतकरी संघटनेची प्रेसनोट
अंबाजोगाई (जि.बीड)
बाजार समितीत शेतीमालाला आधारभूत किंमत (हमीभाव) मिळवून देण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी (DDR) तातडीने स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिला. थकित पिक विमा, दुष्काळ-अतिवृष्टी अनुदान, पीककर्ज वाटप आणि महावितरण कडून जाणूनबुजून शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास याविषयी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत15 मे 2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता प्रगती सभागृहात बैठक संपन्न झाली.बैठकीला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंके, विधान परिषदेचे आमदार सुरेश धस,प्रा.सुशीलाताई मोराळे. यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सन 2016 ते 2022 या कालावधीत ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स लि. युनायटेड इंडिया इन्शुरन्स लि. भारतीय कृषी विमा कंपनी तसेच बजाज अलियान्स विमा कंपनी यांच्यामार्फत पिक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र वेगवेगळी कारणे देऊन शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये पीकविमा कंपन्यांनी बुडविले. देवेंद्र सरकार पासून एकनाथ शिंदे सरकारपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच गुलाबी बोंड अळी, दुष्काळ, वादळ,वारा,अतिवृष्टी, सततचा पाऊस, अशा विविध नावाखाली अनुदानाच्या घोषणा करण्यात आल्या. एवढेच नाही तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान जाहीर केले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी व अनुदानाची रक्कम डी.बी.टी. प्रणालीने शेतकऱ्यांना वाटप केली. मात्र कर्जमाफी आणि अनुदानाच्या रकमा अनेक शेतकऱ्यांना अजूनही मिळालेल्या नाहीत.याविषयी बैठकीत सखोल चर्चा झाली. पिक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी कर्मचाऱ्यांनी बैठकीत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पिक विमा कंपनीकडे थकलेली पिक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम आणि राज्य सरकारकडे थकलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राहिलेल्या शेतकऱ्यांची रक्कम मिळविण्यासाठी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी हा विषय एकनाथ शिंदे सरकारकडे मांडण्याचे कबूल केले.
बॅंकांचा होल्ड आणि पीककर्जाचे वाटप
**************************************
राष्ट्रीयीकृत,खाजगी,ग्रामीण आणि सहकारी बँकांच्या शाखाधिकाऱ्यांनी शेती कर्ज वसुलीसाठी पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम, तसेच दुष्काळ, वादळ, वारा, अतिवृष्टी, सततचा पाऊस अशा अनुदानाच्या रकमांना होल्ड लावले आहे.अनुदान आणि पीकविमा नुकसान भरपाई च्या रकमेला लावलेला होल्ड काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रणी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. पीक कर्जासाठी पीक हेच तारण असल्याने रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या 30 एप्रिल 2007 रोजी काढलेल्या परिपत्रकाची बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करावी. त्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घ्यावीत. पीक कर्जासाठी सिबीलची अट लावता येणार नाही. असे परिपत्रक सहकार आयुक्तांनी 30 डिसेंबर 2022 रोजी काढले आहे. त्याची काटेकोरपणे जिल्ह्यात अंमलबजावणी करावी अशी भूमिका शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी मांडली. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी संबंधितांना सूचना केल्या.
खेड्यापाडयात ‘झिरो’ कर्मचारी
**************************************
गेवराई तालुक्यातील पाचेगाव जवळील 33 K.V चे सबस्टेशन गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे.तरीही शेतकऱ्याकडून विज बिल वसुली केली जाते. असा विषय शेतकरी युवा आघाडीचे रामेश्वर गाडे यांनी उपस्थित केला.वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता,उप अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि लाईनमन यांच्यात कसलाही समन्वय नसून खेड्यापाड्यातील ‘झिरो’ लाईनमन ही व्यवस्था अनधिकृतपणे चालवीत आहेत. झिरो लाईनमनला वीज यंत्रणा हाताळणीचे पूर्ण अधिकार वापरायला मिळत आहेत. महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी गुत्तेदारांची यंत्रणा सांभाळण्यात व्यस्त आहेत. अशी गंभीर तक्रार केली.
वीज वितरण कंपनीतील सावळा गोंधळ संपवायचा असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी वीज कायदा 2005 मधील तरतुदींचा वापर करावा आणि प्रत्येक ग्राहकाला कमी दाबाने वीज पुरवठा होत असेल किंवा कुठल्याही कारणाने वीजपुरवठा बंद असेल तर प्रति तास 50/- रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणला द्यावा. अशी एकमुखी मागणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच जिल्ह्यातील तलाठी, ग्रामसेवक,कृषी सहाय्यक, शिक्षक यांनीही झिरो कर्मचारी गावोगावी नेमले आहेत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. याबाबत कारवाई करू अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली.
या बैठकीला शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष आजीमुद्दीन शेख,अनुरथ काशीद, लखन होके, मच्छिंद्र जगताप, सतीश रिंगणे, सुभाष मायकर, महादेव गायकवाड, अण्णासाहेब मस्के,गणेश गायकवाड, नीलाराम टोळे, रघुनाथ गावडे, रामप्रसाद गाडे, रिजवान बेग, बाळासाहेब गुंड, सत्यप्रेम मायकर, नारायण मुळे, आप्पाराव पांढरे, ॲड.अंबादास जाधव, बीड बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर आदि उपस्थित होते.
**************************************
कालिदास आपेट,
कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.
9822061795
************************************